खोकर येथे विजेच्या शॉर्टसर्कीटने दोन एकर ऊस जळाला

खोकर येथे विजेच्या शॉर्टसर्कीटने दोन एकर ऊस जळाला

आठवड्यातील दुसरी दुर्घटना, आंदोलनाचा इशारा

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारात एकाच आठवड्यात तीन शेतकर्‍यांचा मिळून साडेसात एकर ऊस विजेच्या शार्टसर्कीटमुळे जळाला असून परीसरात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा हाताच्या अंतरावर असल्याने या वीज वाहक तारामध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडून आग लागत असल्याने महावितरणने या वीजवाहक तारा उंच कराव्यात अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांकडून दिला जात आहे.

खोकर शिवारात पाच दिवसांपूर्वी गट नं. 80 मधील सुभाष लक्ष्मण धाकतोडे यांचा अडीच एकर व सोहेल गफार मिर्झा यांचा तीन एकर असा साडे पाच एकर तोडणीला आलेला ऊस विजेच्या शार्टसर्कीटमुळे जळाल्याची दुर्घटना ताजी असतानाच काल याच परीसरातील खोकर-टाकळीभान रोडलगत असलेल्या गट नं. 16 मधील राजेंद्र सोपान पटारे यांचा दोन एकर तोडणीला आलेला ऊस विजेच्या शार्टसर्कीटने आग लागून जळाला.

खोकर शिवारातील गट नं.16 मध्ये असलेल्या पटारे डीपीवरून इतर शेतकर्‍यांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. येथून जवळच असलेल्या राजेंद्र सोपान पटारे यांच्या ऊसाच्या क्षेत्रातून दोन ठिकाण्याच्या विज वाहक तारा आहेत, त्या झोळ पडल्याने हाताच्या अंतराइतक्या खाली आल्या आहेत तर काही ठिकाणी उसाच्या शेंड्यांच्या बरोबरीत लोंबकळलेल्या आहेत. महावितरणकडे वीजवाहक तारा उंच करण्याची अनेकदा मागणी केली असल्याचे पटारे यांनी सांगितले.

सध्या पहाटे साडेपाच ते साडेबारा अशी वीजपुरवठ्याची वेळ आहे. परंतु या वीजवाहक तारांवर सकाळी बसलेल्या पक्षांच्या हालचाली दरम्यान या वीजवाहक तारा हलल्याने आगीचे लोळ खाली पडून ऊस पेटत असल्याचे पटारे यांच्या लक्षात आले, त्यांनी आरडाओरडा केला परंतू विज पुरवठा सुरू असल्याने लगतचे शेतकरी जमा होवूनही कुणीही आग विझविण्यासाठी धजेना. दरम्यान काहींनी महावितरणशी संपर्क केला. तर काहींनी रोहीत्रापासून वीज पुरवठा खंडित केल्यानंतर मदत सुरू झाली. दरम्यान, ही घटना समजताच अशोक कारखान्याचे अग्नीशामक वाहन आल्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. याची माहिती समजूनही महावितरणचे कुणीही या क्षेत्राकडे न फिरकल्याने परीसरातील शेतकर्‍यांत संताप व्यक्त होत आहे.

यावेळी अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव जाधव, पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य ताजखाँ पठाण, केशवराव चव्हाण, तुकाराम सलालकर, कैलास सिन्नरकर, कैलास भणगे, शिवाजी पटारे, अशोक पटारे, हुसैन सय्यद, मिननाथ पटारे आदींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला होता.

दरम्यान, विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे ऊस जळण्याची वर्षातील दुसरी घटना आहे. खोकर येथील राजेंद्र पटारे यांचा याच क्षेत्रातील ऊस यापूर्वी दि. 22 जानेवारी 2021 रोजी अशाच प्रकारे विजेच्या शार्टसर्कीटमुळे जळाला होता, त्यावेळी संबंधित शेतकर्‍यांनी महवितरणचे या वीज वाहक तारांकडे लक्ष वेधत त्या तारा उंच करण्याचे आवाहन केले होते, त्यावेळी तत्कालीन कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक यांनी सांगूनही काहीच कारवाई झाली नसल्याने आता दहा महिन्यांनंतर याच क्षेत्रात ही दुसरी घटना असल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल चिड व्यक्त होत आहे. महावितरणने तातडीने परीसरातील सर्व शेतातील वीज वाहक तारा ओढून उंच केल्या नाही तर लवकरच शेतकरी तीव्र अंदोलन छेडणार असल्याचे यावेळी अशोकचे उपाध्यक्ष पोपटराव जाधव यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com