खरवंडी कासार ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

सोयीसुविधा लवकर न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
खरवंडी कासार ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

खरवंडी कासार |वार्ताहर| Kharwandi Kasar

पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या खरवंडी कासार येथे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार असून पायाभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालय येथे टाळे ठोकत आंदोलन केले.

खरवंडी कासार गावात रस्त्यांसह, पाणी, कचरा, आरोग्य, स्वच्दतागृहे असे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून याबाबत काहीच उपायोजना केल्या जात नाहीत. सर्व बाजूने गावात येणारे रस्ते पावसामुळे चिखलमय झाले असल्याने रस्ता निसरडा बनल्याने अनेक जण रस्त्यावर पडून जखमी होत आहेत, गावातील पोलीस स्टेशन रोडमध्ये कचरा डेपो झाल्याने तेथील व्यापारी व रहीवासी मेटाकुटीला आले आहेत.

सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. सार्वजनीक स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवली जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. यासह अनेक समस्या आहेत. मात्र सरंपच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे गावासाठी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध झालेला 40 लाखाचा निधी पडुन आहे. तो न वापरल्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरपंच ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची कामे करत नसल्याने अखेर गावातील संतप्त महिलांनी आज आंदोलन करत ग्रामपंचायतीला कुलुप ठोकले आहे.

या आंदोलनात उज्वला अंदूरे, नंदा सांगळे, स्वाती माताडे, मनिषा माताडे, वर्षा ढगे, संगिता भोसले, हिरा माताडे या महीला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तसेच ग्रामस्थ भाऊसाहेब सांगळे महेश बोरूडे रेवणनाथ ढगे कुमार अंदूरे व इतर नागरीक उपस्थित होते.

आमदारांच्या सानिध्यात हे गाव असताना देखील तीन महिन्यांपासून गावात नळाला पाणी नाही. गावातील रस्ते वीजपुरवठा गटार कचरा व्यवस्थापन नाही. आज या महीला फक्त ग्रामपंचायत मध्ये आल्या आहेत. मात्र पाच दिवसात रस्ते गटार पाणी या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास या महीलांना घेऊन पुढचे आंदोलन हे शिवसेना स्टाईलने बिडीओ कार्यालयात घुसून करू

- अमोल जायभाये, शिवसेना तालुका उपाध्यक्ष पाथर्डी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com