नगर तालुक्यात खरीपाची 43 हजार हेक्टरवर पेरणी

नगर तालुक्यात खरीपाची 43 हजार हेक्टरवर पेरणी

अहमदनगर (वार्ताहर)- नगर तालुक्यात 43 हेक्टरवर खरीप पिकाची पेरणी झाली असून मूग, बाजरी पिकांच्या क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे करोना विषाणूच्या संकट काळातही दमदार पावसामुळे शेतकर्‍यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्यात सर्वदूर पुरेसा पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांना चांगला आधार मिळाला.

भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठी मदत झाली असून तालुक्यातील छोटे मोठे बंधारे तसेच तलावांमध्ये पाणीसाठा वाढण्यास पावसाचा चांगला फायदा झाला.

सुरुवातीला रोहिणी तसेच मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने शेतकर्‍यांनी मूग, बाजरी, मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांच्या पेरण्यांसाठी लगबग केली. यासाठी शेतकर्‍यांनी महागडी बी -बियाणे तसेच रासायनिक खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली. मात्र पेरणी झाल्यानंतर पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. काही ठिकाणी मुगाचे पीक सुकू लागले तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते.

परंतु बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आर्द्रा नक्षत्रातील पावसाने तालुक्यातील सर्वच भागात जोरदार हजेरी लावल्याने सुकलेल्या खरीप पिकांना संजीवनी मिळाली. तालुक्यातील साकत, वाटेफळ, रुई छत्तीसी, दहिगाव, वाळकी, शिराढोण, राळेगण, गुंडेगाव, चास आदी ठिकाणी खरीप हंगामात मूग-बाजरीचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com