राहाता तालुक्यात 40 हजार हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या

राहाता तालुक्यात 40 हजार हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या
संग्रहित

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) - जून महिन्यात बियाणे, खते व पेरण्यासांठी शेतकर्‍यांची लगबग असे दरवर्षीचे चित्र. मात्र चालू वर्षी लॉकडाऊन व करोनाचा प्राद्रुर्भाव यामुळे चित्र काहीसे बदलले आहे. असे असले तरी कृषी विभागाकडून राहाता तालुक्यात खरीपासाठी सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बियाणे व खंताचे नियोजन केले जात आहे.

तालुक्यात जवळपास 57 हजार हेक्टर लागवडीयोग्य शेती क्षेत्र असुन यापैकी 38 हजार हेक्टर क्षेत्र बगायती तर 19 हजार 500 हे जिरायती आहे. दरवर्षी सरासरी 32 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होते. मान्सुन तोंडावर आला असल्याने करोना संकटकाळात बळीराजाला साथ देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. चांगल्या पावसाचा अंदाज गृहीत धरून चालू वर्षी विभागाकडुन राहाता तालुक्यात जवळपास 40 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरणीसाठी नियोजन केले आहे. पेरणी क्षेत्रासाठी आवश्यक असलेले 19 हजार 614 क्विंटल बियाणांची तरतुदही कृषी विभागाकडुन करण्यात येत आहे.

चालू वर्षी 16 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 8 हजार 500 हेक्टर वर मका, 3 हजार 652 हे. बाजरी, 8 हजार 500 हे. चारा पिके, कपाशी 1 हजार 456 हे. भुईमुग 630 हे. तुर 450 हे., मुग 170 हे. वर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे. त्यासाठी 12 हजार 375 क्विंटल सोयाबीन बियाणे तसेच 1 हजार 712 क्विंटल मका, 146 क्विं. बाजरी, 4 हजार 764 क्विं. चारा पिकाचे बियाणे, 473 क्विं. भुईमगु असे जवळपास 19 हजार 614 क्विं. बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत चालु वर्षी 258 शेतकर्‍यांना 393 हेक्टर फळबागांसाठी लाभ देण्याचे नियोजित आहे. बियाणे महामंडळाकडुन सोयाबीनचे दरवर्षीप्रमाणे पन्नास टक्के बियाणे उपलब्ध होत असते.

उर्वरीत बियाण्यासाठी खाजगी कंपन्या तसेच विभागाने शेतकर्‍यांकडील घरगुती सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासुन 70 ते 90 टक्क्यापर्यंत उगवण क्षमता असलेल्या घरगुती बियाण्यांचे पेरणीसाठी गरज पडल्यास नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ऐन सोंगणीत परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते. शासनाच्या घोषणेप्रमाणे तालुक्यात जवळपास दहा हजार बाधीत शेतकर्‍यांना 7 हजार 507 हेक्टर वरील नुकसानीसाठी 7 कोटी 66 लाख 76 हजारांचे अनुदान मदत स्वरूपात वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊन व करोनाचा प्राद्रुर्भाव असला तरी चालु खरीपासाठी बियाणे व खतांच्या पुरवठ्याचे योग्य नियोजन कृषी विभागाकडून होत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com