
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
यंदा अतिरिक्त पावसामुळे जिल्ह्यात 5 लाख 92 हजार हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कडधान्य पिकांसोबत कपाशी आणि सोयाबिनची विक्रमी पेरणी झाली असून अनेक ठिकाणी जादाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष करून पावसाने उघडीप न दिल्याने कपाशी पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.
जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात ढगाळ वातावरण आणि भिज पाऊस झाला. त्यानंतर अॅगस्टच्या सुरूवातीला जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून यामुळे काही भागात पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख 79 हजार 768 क्षेत्र प्रस्तावित असतांना प्रत्यक्षात 5 लाख 92 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. दुसरीकडे भाताचे आगर असणार्या अकोले तालुक्यात यंदा भाताची लागवड कमी झालेली आहे. प्रत्यक्षात भाताची लागवड 17 हजार 276 हेक्टरवर नियोजित असतांना आतापर्यंत 9 हजार 151 हेक्टरवर (52 टक्के) झालेली आहे. सध्या अकोले तालुक्यात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे.
पूर्वी पारंपरिक पीक असणार्या बाजारीऐवजी शेतकर्यांनी सोयाबीनाला पसंती दिल्याने बाजारी क्षेत्र देखील घटले आहे. जिल्ह्यात 84 हजार 805 हेक्टवर बाजरीची पेरणी झालेली असून तिची टक्केवारी 56 टक्के आहे. तर सोयाबीनचे क्षेत्र 87 हजार 330 हेक्टर प्रस्तावित असतांना प्रत्यक्षात 1 लाख 41 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात सोयाबीनची पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी 160 टक्के आहे. तर कपाशीची लागवड 1 लाख 22 हजार प्रस्तावित असतांना प्रत्यक्षात 1 लाख 25 हजार हेक्टरवर लागवड झालेली असून टक्केवारी 102 टक्के आहे.
खरीप हंगामासाठी पेरणी चांगली झालेली असतांना जादाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होतांना दिसत आहे. अनेक तालुक्यात जमीनीत पाणी साठून राहिल्याने पिके उफाळू लागली आहेत. काही ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाऊस आणि अतिवृष्टीत होत असल्याने त्याचा पिकांना फटका बसतांना दिसत आहे. आता खरीप हंगामाचा पेरणी कालावधी संपला असून अनेक ठिकाणी पिके फुलोरा आणि दाणा भरण्याच्या स्थितीत आहे. दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांची सोंगणी आणि काढणी सुरू आहे.
पीक अन् पेरणी
भात 9 हजार 151, बाजारी 84 हजार 805, मका 65 हजार 355, तूर 49 हजार 675, मूग 41 हजार 261, उडिद 62 हजार 742, पावसाळी भूईमूग 4 हजार 682, तीळ 78, कराळे 92, सोयाबीन 1 लाख 41 हजार, कापूस 1 लाख 25 हजार हेक्टर पेरणी झाली आहे.
कांदा व ऊस
विविध चारा पिके 70 हजार 806, कांदा 6 हजार 561, भाजीपाला 18 हजार 35, मसाला पिके 261, औषधी व सुगंधी वनस्पती 61, फुल पिके 1 हजार 65, फळपिके 7 हजार 78, रुपांतरीत पिक क्षेत्र 1 लाख 38 हजार, नवी ऊस लागवड 63 हजार 615 हेक्टर आहे.