पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी हवालदिल

खरीप पेरणी वेळेवर होण्याकरिता बळीराजाचे आभाळाकडे डोळे
पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी हवालदिल

राहाता |वार्ताहर| Rahata

पावसाचे आगमन लांबणीवर गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून खरीप पेरणी वेळेवर होण्याकरिता बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. 18 जून होऊनही राहाता तालुक्यात मान्सूनचे दमदार आगमन न झाल्याने खरीप पेरणीला उशीर होत असल्याने शेतकरी बांधव चिंतातूर झाला आहे. पावसाचे आगमन या आठ दिवसात न झाल्यास खरीप पेरणी होईल की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वरुण राजाचे आगमन लगेच होण्याकरिता बळीराजाने देवाला साकडे घालण्यासाठी सुरुवात केली असून पावसाची वाट बघत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असे भाकीत अनेक अभ्यासक तज्ञ मंडळींनी केले असल्यामुळेे यावर्षी दमदार पाऊस होऊन चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकरी बांधवांना लागली आहे.

पाऊस लवकरच होणार असल्याच्या भाकितामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करण्यास सुरुवात करून पैशाची जमवाजमव करून बियाणे व खताची खरेदी करून ठेवली आहे. राहाता तालुक्यात 41 हजार हेक्टर खरीप क्षेत्र पेरणी उद्दिष्ट कृषी विभागाने यावर्षी ठेवले आहे. शेतकरी बांधवांना खते व बियाणाची कमतरता भासू नये यासाठी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. सोयाबीन, मका, कपाशी, पशुधनाचे चारा पिके प्रामुख्याने खरीप हंगामात पाऊस पडल्यानंतर लगेच शेतकरी बांधव शेतात या पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरू करतात. परंतु जून महिना संपायला काही दिवस बाकी असतानाही वरूण राजा कृपादृष्टी करायला तयार नाही. त्यामुळे राहाता तालुक्यातील विहीर व कुपनलिकांचे पाण्याची पातळी खोल जाऊ लागल्याने तालुक्यातील पेरू, चिकू, डाळिंब, आंबा, द्राक्षे या फळबागांबरोबरच ऊस व जनावरांची चारा पिके पाण्याअभावी सूकून चालली आहे.

पाऊस जर लवकर झाला नाही तर शहराबरोबरच तालुक्यातील इतर गावांची पिण्याची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू शकते. मागील मे महिन्यात गोदावरी कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन आल्यामुळे कालव्याखालील लाभधारक शेतकर्‍यांच्या पिकांना जीवदान मिळत आहे. परंतु ज्या भागात गोदावरी कालव्याचे पाणी जाऊ शकत नाही त्या भागातील शेतकर्‍यांची पिके पाऊस लांबणीवर गेल्याने सुकून चालली आहे.

मागील काही वर्षापासून शेतकरी करोनामुळे तसेच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच मान्सून लांबणीवर गेल्यामुळे बळीराजाला पुन्हा आर्थिक संकटांची चिंता जाणवू लागली आहे. वरूण राजाने लवकर कृपादृष्टी केली तरच खरीप हंगामाची पेरणी वेळेवर होऊन शेतकर्‍यांना यातून मिळणार्‍या उत्पन्नातून थोडीबहुत आर्थिक मदत होण्यास मदत होऊ शकेल. शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे दूध व्यवसायातून मिळणार्‍या पैशातून शेतकर्‍यांचे आर्थिक गणिते जुळत नसल्यामुळे शेतकर्‍यांवरचे कर्जाचे ओझे वाढत चालले आहे.

दारणा व गंगापूर या धरण क्षेत्रातही पाऊस न झाल्यामुळे धरणाची पाण्याची पातळी खोल जाऊ लागली आहे. जर पाऊस आणखी काही दिवस झाला नाही तर नागरिकांना पिण्याचे पाणी आवर्तन देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे लागेल. पिण्याचे पाणी राखीव ठेवल्यामुळे शेती पिकांना धरणातून आवर्तन देणे शक्य होणार नाही. परिणामी सध्याच्या शेतीमधील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. बळीराजावर येणारे आर्थिक संकट दूर होण्याकरिता पावसाचे आगमन होणे अत्यंत गरजेचे आहे. वरूण राजा वेळेवर आला तरच खरिपाची पेरणी वेळेवर होऊन शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com