
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पावसाळा (Rain) सुरु होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र पर्जन्यछायेतील भागावर अजूनही पावसाची अवकृपाच आहे. जुलै महिन्यात झालेल्या अत्यल्प पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या खरिपातील (Kharif Crops) सोयाबीन (Soybeans), मका (Corn), कपाशी पिकांनी (Cotton Crops) आता माना टाकण्यास सुरूवात केली आहे. पर्जन्यछायेतील प्रदेशावर पावसाची अवकृपा झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने खरिप हंगाम अखेरच्या घटका मोजत आहेत.
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, संगमनेर सर्वदूर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अद्यापही अनेक भागात खरिपाच्या पेरण्याही नाहीत. जुलै महिन्यातील अल्पशा पावसावर उतरून आलेल्या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. सोयाबीन (Soybeans), मका (Corn), कपाशी (Cotton), भाजीपाला (Vegetables), फळबागा (Orchard), ऊस यासह चारा पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने खरीप हंगामावर पाणी फेरले अशीच परिस्थिती सध्या आहे. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या होणे शक्य नाही.
हा हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांची दिवाळीही होणार नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिप पिकासाठी पेरणी पूर्व मशागत, बियाणे, खते, औषधे यावर शेतकर्यांचा मोठा खर्च झालेला आहे. आता खरिप हंगाम वाया गेला तर शेतकर्याच्या डोईवरचे कर्जाचे ओझे आणखी वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. तर काही शेतकर्यांची उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचनाचा आधार घेऊन पिके जगविताना धडपड सुरू आहे.
आता शेतकर्यांना आशा आहे ती रब्बी हंगामातील पिकांची. गोकुळ अष्टमीनंतर पर्जन्यछायेच्या प्रदेशावर पाऊस मेहरबान होतो. पण अल निनोच्या प्रभावाने पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ञ अंदाज व्यक्त करतात. तसे झाल्यास मोठे संकट उभे ठाकणार आहे. ते फक्त शेतकर्यांपुरते मर्यादित नसेल तर भाजीपाला, धान्याचा तुटवडा निर्माण होऊन महागाईने सामान्य जनता होरपळेल. तर पावसाअभावी चारा पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होऊन चार्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार्यासाठी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र जाणार आहे. एकंदरीतच जिल्ह्याचा अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याने दुष्काळी परिस्थिती ओढावते की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने आताच सावध होवून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
भंडारदरा धरणातून आवर्तनाची मागणी
जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण भरले असले तरी धरण लाभक्षेत्र मात्र कोरडेठाक आहे. आवर्तनाचे पाणी मिळाले तरच खरिप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हाती येणार आहे. अन्यथा खरिप हंगामावर केलेला खर्चही वाया जाणार अशीच काही परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातून खरिप पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले गहू, कांदा पिके पावसाने भिजल्याने मोठा खर्च वाया गेला आहे. आणि आता पावसाअभावी खरिप हंगाम संकटात असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.