
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुक्यातील खारेकर्जुने (Khare Karjune) येथील घर फोडून (Burglary) एक लाख 36 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. बुधवारी (दि. 8) सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
कल्पना सतिष निमसे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी शोकेसचे ड्राव्हर मधून सोन्याचे कानातील वेल, दोन गंठण, मंगळसूत्रातील वाट्या, कर्णफुले असे एक लाख 36 हजार 500 रूपये किमतीचे सुमारे साडे चार तोळ्याचे दागिने (Gold Jewelry) चोरून नेले. दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा.निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.