जमिनी वर्ग एक करून मिळाव्यात यासाठी खंडकरी शेतकर्‍यांची बेलापुरात आज बैठक

जमिनी वर्ग एक करून मिळाव्यात यासाठी खंडकरी शेतकर्‍यांची बेलापुरात आज बैठक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खंडकरी शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक धारणेच्या करून मिळाव्यात, या मागणी संदर्भात विचार विनिमय करून पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी संबंधित खंडकर्‍यांची बैठक आज बुधवार दि .3 ऑगस्ट रोजी स. 11 वा. खंडकर्‍यांचे नेते कॉ. अण्णा पा. थोरात यांचे अध्यक्षतेखाली बेलापूर एम. पी. सोसायटीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती खंडकरी जमीन वाटप समितीचे सदस्य सुधाकर खंडागळे यांनी दिली.

यासंदर्भात श्री. खंडागळे यांनी सांगितले की, शासनाने शेती महामंडळासाठी ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्या भोगवटादार वर्ग एक धारणेच्या होत्या. जमिनी परत करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ठरविली, त्यात खंडकर्‍यांना जमिनी परत देताना त्या भोगवटादार- वर्ग 1 धारणेच्या देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात खंडकर्‍यांना जमिनी देताना त्या भोगवटादार 2 धारणेच्या देण्यात आल्या. यामुळे खंडकरी शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यात आली.

भोगवटादार वर्ग 2 धारणा असल्याने शेतीसाठी कर्ज मिळविण्यात अडचणी येत आहेत. हे ध्यानात घेता भोगवटादार-2 धारणेच्या जमिनी खंडकर्‍यांना भोगवटादार वर्ग 1 च्या करून मिळाव्यात, यासाठी विचारविनिमय व पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस खंडकर्‍यांचे नेते कॉ. अण्णा पा. थोरात मार्गदर्शन करणार आहेत. तरी खंडकरी शेतकर्‍यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सुधाकर खंडागळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com