खंदरमाळवाडीच्या ग्रामसभेत गोंधळ

भ्रष्टाचाराचा आरोप सहन न झाल्याने सरपंचांची राजीनाम्याची घोषणा
खंदरमाळवाडीच्या ग्रामसभेत गोंधळ

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा मंगळवारी (दि.24) गोंधळात पार पडली. ग्रामस्थांच्या प्रश्नांचा भडीमार व सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून असंतुष्ट उत्तरे यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला. ग्रामस्थांनी सरपंचांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांना तो सहन न झाल्याने सरपंच शिवाजी फणसे यांनी थेट सरपंच व सदस्यपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली.

खंदरमाळवाडी ग्रामपंचायतीची दीड वर्षांपूर्वी निवडणूक झाली. यावेळी सरपंचपदी शिवाजी फणसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतरच्या कार्यकाळात ग्रामसेवक अशोक कडनर व सरपंच फणसे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू केला. मासिक मिटिंगमध्ये सदस्यांना विचारात न घेता ठराव करून कामे मंजूर केली, असे आरोप सदस्यांनी केले. घरकुलाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आदिवासी सुधार निधी प्रश्न, सिटीसर्वेमध्ये गोंधळ, शिंदेवस्ती येथील विजेचा प्रश्न, पवार वस्ती विजेचा पाण्याचा प्रश्न, आर.ओ. प्लांटचा विषय, कर्मचार्‍यांच्या पगाराचा प्रश्न, तसेच 36 एल.ई.डी. बल्बची किंमत दीड लाख रुपये ग्रामसेवकांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घातला. अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे सरपंच व ग्रामसेवकांना देता आली नाही.

दोघांनीही राजीनामा द्यावा असे म्हणत ग्रामस्थ संतापले. सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर ग्रामस्थांनी आरोप केल्यानंतर सरपंच फणसे यांनी स्वतःहून सरपंच व सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. ग्रामसेवक अशोक कडनर यांनी त्यांच्याकडे या गावाचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे कारण देत माझे एक वर्ष पूर्ण झाले असून हा अतिरिक्त कार्यभार संपला आहे. मी तुमच्या गावचा निरोप घेत असून पुढील सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून चांगले कामे करून घ्या, असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

शासकीय कामे कशी करायची? याचा मला अनुभव आहे. आजपर्यंत माझा कारभार स्वच्छ असताना काही लोकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हे मला सहन न झाल्याने मी सरपंच व सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. काही अफरातफर आढळल्यास तक्रार करावी, त्यासाठी मी समर्थ आहे.

- शिवाजी फणसे, सरपंच, खंदरमाळवाडी.

ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक यांना केलेल्या कामांच्या संदर्भात ग्रामस्थांनी प्रश्न विचारले असता त्यांना समर्पक उत्तरे देता आले नाही. उत्तरे देता न आल्याने सरपंच यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यामागे नेमके गौडबंगाल काय?

- गणेश लेंडे, सदस्य, खंदरमाळवाडी ग्रामपंचायत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com