खंडाळ्यातील तरुणाचा अक्कलकोटमध्ये विहिरीत पडून मृत्यू

खंडाळ्यातील तरुणाचा अक्कलकोटमध्ये विहिरीत पडून मृत्यू

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील ऊस तोडणीसाठी अक्कलकोट येथे गेलेल्या ऋषिकेश भाऊसाहेब खरात (वय 18) या तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील ऋषिकेश भाऊसाहेब खरात व त्याची आई सौ.अलका भाऊसाहेब खरात हे दोघे ऊस तोडणी मजूर म्हणून अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी एक महिन्यापूर्वी गेले होते. सोलापूर जिल्ह्यातील हे गाव असून गोकुळ सहकारी साखर कारखान्यासाठी ते ऊसतोडणी करीत होते.

गुरुवारी दुपारी जेवणासाठी सुट्टी झाल्यावर ऋषिकेश पाणी आणण्यासाठी शेजारील विहिरीवर गेला. बराच वेळ होऊनही तो परतला नाही. दुसरे दिवशी शुक्रवारी त्याची शोधाशोध सुरू झाली. ऊस तोडणी मजुराच्या अड्ड्यापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीलगत त्याच्या चपला व कपडे आढळून आले. खरात मायलेक हे त्यांच्या पाहुण्यांसमवेत ऊस तोडणीसाठी गेलेले होते त्यामुळे सर्वचजण शोधाशोध करू लागले. काल सकाळी मयत ऋषिकेश याचा मृतदेह त्याच विहिरीत तरंगताना आढळला.

या घटनेचे वृत्त खंडाळा येथे समजल्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन बोरकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप विघावे, ताराचंद आलगुंडे, राजू खरात, भिका खरात, देवीदास खरात हे सोलापूर जिल्ह्यातील हुन्नर येथे घटनास्थळी गेले. नांदूर ( ता. राहाता ) येथील योगेश नंदकुमार बर्डे हा तरुण सोलापूर येथील पोलीस स्टेशनला एलसीबी ब्रँचला असल्यामुळे त्यांनी तसेच अक्कलकोट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अजिंक्य बिराजदार यांनी सहकार्य केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह खंडाळा येथून गेलेल्या ग्रामस्थांच्या व आईच्या ताब्यात दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com