शेवगाव : खानापुरात गावठी कट्ट्यासह एकजण जेरबंद

शेवगाव : खानापुरात गावठी कट्ट्यासह एकजण जेरबंद

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला सापळा रचून शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्याकडून चोरीच्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत असून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

खानापूर, रावतळे, कुरुडगाव येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. नामदेव भागवत वटाने (वय 32, मुळगाव सावळेश्वर राक्षसभुवन ता. गेवराई, हल्ली राहणार कुरुडगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व विविध कंपनीच्या चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस अंमलदार वासुदेव डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम कलमाप्रमाणे (आर्म अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी (दि. 2) रात्री 11 च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व पोलीस कर्मचार्‍यांनी खानापूर, रावतळे-कुरुडगाव रस्त्यावरील हॉटेल शिवार येथे छापा टाकला. तेथील नामदेव भागवत वटाने यास गावठी कट्टा व चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी तीन वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी हस्तगत केल्या. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी (दि. 3) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास शनिवार दि.6 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, वासुदेव डमाळे, संदीप दरवडे, किशोर शिरसाठ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com