खळीतील आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा

खळीतील आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंदाजे 60 लाख रुपये खर्च करून सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या उपकेंद्राचे उद्घाटन होऊनही हे उपकेंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झालेले नसल्यामुळे हे उपकेंद्र कोविड - 19 च्या संकटकाळात सुरू करावे, अशी मागणी खळी ग्रामस्थांनी केली आहे.

उद्घाटन होऊनही मागील दोन वर्षापासून कर्मचार्‍यांअभावी खळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद असल्याची उत्तरे प्रशासनाकडून दिली जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, सोमनाथ नागरे, प्रा. बाळासाहेब वाघमारे आदींनी ग्रामसभेमध्ये अनेकवेळा उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कोविड - 19 चे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून गावात अनेक करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तसेच गावात अनेकांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळी येथील आरोग्य उपकेंद्र सुरु असते तर नागरिकांना तात्काळ प्राथमिक उपचार घेता आले असते. यामुळे ‘खळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा’ अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने खळी येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तात्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, सोमनाथ नागरे आदी नागरिकांनी करून येथेच 20 ते 25 खाटाचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

खळी येथे दोन वर्षापूर्वी सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य उप केंद्राची इमारत उभी राहिली असून आरोग्य विभागाकडे कर्मचारी नसल्याने खळी आरोग्य उप केंद्रात कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. कोविड संकट काळात हे आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून हे उपकेंद्र सुरू व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू आहे.

- राजेंद्र चकोर, सरपंच, खळी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com