निमगावखैरी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी तिरंगी लढत

तीनही गटांना तेरा जागांवर उमेदवार देण्यात अपयश
निमगावखैरी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी तिरंगी लढत

खैरी निमगांव |वार्ताहर| Khairi Nimgav

निमगाव खैरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील भाजपासह शिंदे सेना गटाचे राजेश तांबे, राजेंद्र बनकर, विलासराव शेजुळ यांच्या गटासह गट प्रमुखांनी अलिप्त राहण्याची भुमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती सरपंचपदासाठी दाखल 8 उमेदवारी अर्जापैकी पाच जणांनी माघार घेतल्याने सरपंच पदासाठी तिरंगी लढत होईल.

तेरा सदस्य संख्या असलेल्या जागांसाठी 53 अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननीत एकही अर्ज न उडाल्याने निवडणुकीत रगंत आली होती. मात्र, अर्ज माघारीप्रसंगी निलेश परदेशी गटाच्या दोन जागा बिनविरोध निघाल्याने तसेच 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ 21 उमेदवारच निवडणूक रिंगणात राहीलेले आहेत. विशेष म्हणजे तिनही गटांना आपापल्या गटाच्या तेराच्या तेरा जागांवर उमेदवार देण्यात अपयश आले. प्रभाग एक मधील दोन जागा बिनविरोध झाल्या असल्यातरी झुराळे - भागडे - कालंगडे या गटाला प्रभाग एक मध्ये एक आणि प्रभाग पाच मध्ये दोन तर बिनविरोध झालेल्या प्रभागातील दोन याप्रमाणे पाच जागांवर उमेदवार मिळाले नाही. शिवाजी शेजुळ गटाला बिनविरोध झालेल्या प्रभाग एक मध्ये दोन जागेवर उमेदवार मिळाला नाही.

तर निलेश परदेशी गटाला दोन जागा बिनविरोध मिळाल्या, मात्र प्रभाग दोन मध्ये तीन, प्रभाग तीन आणि चार मध्ये प्रत्येकी दोन तर प्रभाग पाच मध्ये एका जागेवर याप्रमाणे आठ जागेवर उमेदवार मिळाले नाही. सरपंचपद नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षीत असून सरपंच पदासाठी झुराळे दिपक चांगदेव, निता नितीन भागडे, रामेश्वर निवृत्ती झुराळे, गणेश विश्वनाथ भाकरे, अरुण आण्णासाहेब काळे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दत्तात्रय वेणुनाथ झुराळे, निलेश बाळासाहेब परदेशी, शिवाजी आप्पासाहेब शेजुळ यांच्यात तिरंगी लढत होईल. प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती प्रवर्ग स्त्री, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती या तीन जागांसाठी दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यामध्ये निलेश परदेशी गटाच्या वैशाली बाळासाहेब परदेशी आणि विजय मदनसिंग परदेशी या दोन जागा बिनविरोध झाल्या. झुराळे - भागडे - कालंगडे गटाच्या वैशाली मधुकर बोरगे, निलेश परदेशी गटाच्या अलका पुंजाराम बत्तीसे, शिवाजी शेजुळ गटाच्या सुशिला नानासाहेब तुपे यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल. प्रभाग दोनमध्ये तीन जागांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, अनुसुचित जमाती प्रवर्ग व्यक्ती यासाठी 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. झुराळे - भागडे - कालंगडे गटाचे गणेश विश्वनाथ भाकरे, शोभा आदीनाथ झुराळे, अच्युत बापु गायकवाड यांच्याशी शिवाजी शेजुळ गटाच्या कुंडलीक रेवजी काळे, हनुमान नारायण पवार, सरीता संदीप पोकळे यांच्यात सरळ - सरळ लढत होईल. प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती यासाठी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. झुराळे - भागडे - कालंगडे गटाचे प्रयागबाई तुकाराम काजळे, संतोष पाराजी भागडे तर शिवाजी शेजुळ गटाच्या ताराबाई विजय काळे, त्रिंबक बाळासाहेब उंदरे यांच्यात सरळ - सरळ लढत होईल.

प्रभाग क्रमांक चार मध्ये दोन जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती यासाठी 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले झुराळे - भागडे - कालंगडे गटाचे पुजा अमोल कालंगडे, अनिता सुरेश कालंगडे यांच्याशी शिवाजी शेजुळ गटाचे संजय भिकाजी कालंगडे, जिजाबाई वाघुजी झुराळे यांच्यात सरळ- सरळ लढत होईल.

प्रभाग क्रमांक पाच मध्ये तीन जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री अनुसूचीत जाती प्रवर्ग व्यक्ती यासाठी 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले निलेश परदेशी गटाचे भाऊसाहेब विश्वनाथ पंडीत, कोमल विक्रमसिंग परदेशी, शिवाजी शेजुळ गटाचे नानासाहेब भानुदास तुपे, रोहीणी संजय तरस, हिराबाई भागचंद उंदरे तर झुराळे - भागडे - कालंगडे गटाच्या अनिता सुभाष झुराळे यांच्यात लढत होईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com