खैरी निमगावमधील वाघाई देवी मूर्तीबाबतचे मतभेद मिटले

खैरी निमगावमधील वाघाई देवी मूर्तीबाबतचे मतभेद मिटले

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

परमार्थ केंद्रबिंदू तर किरण हे विचार असून केंद्रबिंदू आणि किरण यांच्यातील अंतर कमी करण्याचे माध्यम म्हणजे परमार्थ होय. जिवनात प्रत्येकाचे विचार भिन्न असतात परमार्थाच्या माध्यमातूनही जर विचार एक होत नसतील तर मग आदर्शवत व्यक्तीचे मत ग्राह्य धरून तो विचार मान्य करावा लागतो.

कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा विचार काही वेळा मान्य नसला तरी तो अनेकदा मान्य करणे आवश्यक असते. विचार एक मताने आला तर परमार्थ चांगला होतो. चांगल्या प्रकारची मूर्ती आणता येऊ शकते. परमार्थाच्या बाबतीत कोणीही व्यक्तिगत ताणण्याचा प्रयत्न करू नये. देवीचे नाव वाघाई आहे त्यामुळे वाघाचे स्वरूप स्पष्ट असावे. मंदिर भव्य दिव्य आहे .गाभारा आणि आसनाची उंची यावरून पाच फुटापर्यंत मूर्ती बसवता येऊ शकते. ग्रामस्थांनी चांगलं काम केलं असून उत्सवही चांगला करावा असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराजांनी खैरी निमगाव येथील वाघाई माता मंदिर या ठिकाणी मूर्ती बाबतचे मतभेद दूर होण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान केले.

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे पार पडलेल्या बैठकित महंत रामगिरी महाराजांच्या आदेशानंतर नविन पाच फुटी मूर्ती बसविण्याचे संपूर्ण गावाने मान्य करत टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. बैठकी दरम्यान सुरुवातीला महाराजांनी भाविकांचे मतप्रवाह ऐकून घेतले. ट्रस्टींनी आणलेली मूर्ती जेव्हा विकली जाईल तेव्हा पैसे द्या, म्हणत नविन मूर्ती बनवणार्‍या मूर्तीकाराला परत देता येईल.

तसेच नविन मूर्ती पसंत नसल्यास परत घ्यावी लागेल या बोलीवर बनवता येईल, असेही महाराज म्हणाले. दरम्यान यापूर्वी झालेल्या बैठकीत जागृत देवस्थान वाघाई माता मूर्ती नियोजन बैठकीत ट्रस्टींनी आणलेल्या नवीन मूर्तीवरून गावात मतभेद होते. त्याची धग कालपर्यंत होती. वाघाई माता देवस्थान हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे. श्रद्धेने इच्छा व्यक्त केल्यास त्या पूर्ण झाल्याचा अनुभव भक्तांना आहे. मंदिराचे काम भव्य दिव्य झाले आहे.

दरम्यान मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. हजारो वनस्पतींमधून हजारो आहार उपलब्ध असताना जीवाची हत्या करण्याची इच्छा देखील मनुष्याने करू नये. जीवाची हत्या करून आपल्याला जगावं वाटणं हे चुकीच आहे. जिवाची हत्या करणे हा कल्याणाचा मार्ग असू शकत नाही. उर्ध्वगती प्राप्त व्हावी यासाठी सात्विक भक्ती केली पाहिजे. त्यामध्ये मांसाहार हा निषेध मानला जातो म्हणून देवाला माध्यम करून जीवाची हत्या करू नये. जिवाची हत्या करून मिळवलेल्या आशिर्वादाचे परिणाम हे वाईट असतात, असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.

28 ला बेटावर बैठक

वाघाचे स्पष्ट स्वरूप असणारी पाच फुटाची व्हिएतनाम मार्बलमधील मूर्ती बनवण्याबाबत तसेच वाघाई देवी प्राणप्रतिष्ठा तारीख फायनल करण्यासाठी 28 ला सकाळी ग्रामस्थ आणि ट्रस्टी एकत्रीतरित्या बेटावर जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com