खडकेवाकेत शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू

खडकेवाकेत शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू

खडकेवाके |वार्ताहर| Khadkewake

राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे अनिल रावसाहेब लावरे (वय 32) या तरुणाचा आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यात जनावरांना पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

अनिलला घरचे काम उरकून पुन्हा बाहेर कामाला जायचे होते. त्याचे जोडीदार त्याला कामावर नेण्यासाठी घरी आले. अनिल कुठे गेला अशी घरी विचारणा केली असता तो पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले असल्याची माहिती घरच्यांनी दिली. अनिलचे चुलत भाऊ संजय हरिभाऊ लावरे हे अनिलला शोधण्यासाठी शेततळ्यावर गेले. त्यांच्यासोबत बाबासाहेब लावरे, संतोष लावरे, चैतन्य कोल्हे, प्रविण लावरे, अरुण लावरे आणि किरण शेळके हे शेततळ्यावर गेले असता त्यांना तिथे मोकळा हंडा दिसला. तसेच शेवाळावर पाय निसटण्याच्या खुणा दिसल्या.

संजय लावरे यांना पोहता येत असल्याने त्यांनी लगेच पाण्यात उडी मारली. त्यांना तळ्यात अनिल यांचा मृतदेह हाती लागला. उपस्थितांच्या मदतीने त्यांनी मृतदेह पाण्याच्या वर काढला. घटनेची माहिती राहाता पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे नेण्यात आला.

सायंकाळी साडेपाच वाजता खडकेवाके (लवणवाडी) येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मित जाण्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी रावसाहेब शहाजी लावरे यांचे ते चिरंजीव होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com