खडकेवाकेत बिबट्याची दहशत

पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
खडकेवाकेत बिबट्याची दहशत

खडकेवाके |वार्ताहर| Khadakewake

राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

मागील काही दिवासांपूर्वी मुरादे वस्ती, आडगाव रोड येथे एका शेतकर्‍याच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्याठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला होता. तरी पण त्याठिकाणी बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यानंतर वारंवार ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत होते. परंतु कुठल्याही प्रकारची हानी होत नसल्याने बिबट्या आपल्या गावापासून दूर गेला आहे, असे ग्रामस्थांना वाटत होते. परंतु सोमवारी रात्री पुन्हा मुजमुले-लावरे वस्तीवरील अशोक जनार्धन लावरे यांचा कुत्रा गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. तरी वन विभागाने तात्काळ मुजमुले वस्ती पिंपळस खडकेवाके शिवेलगत पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मुजमुले व बापूसाहेब चुलभरे यांनी राहाता येथील वनरक्षक अधिकारी एस. एस. साखरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सदर घटनेविषयी संपूर्ण माहिती देऊन बोलणे केले असता साखरे यांनी सांगितले, वस्तीवरील तसेच गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून आपल्या घरातील लहान मुले, वयस्कर माणसे रात्री घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. तसेच गाई, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांना बंदीस्त ठेवणे तसेच शेतामध्ये जाताना समूह करून जाणे, काळजी घ्यावी. लवकरात लवकर आम्ही घटनास्थळाला भेट देऊ व लवकरात लवकर पिंजरा लावू, असे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com