गुलाब डोखे यांच्या अपात्रतेचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

केसापूर : अनिल भगत यांच्या विरोधातील तक्रार नामंजूर
गुलाब डोखे यांच्या अपात्रतेचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी तालुक्यातील केसापूर ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य गुलाब अण्णासाहेब डोखे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश दिला. तर महिला सदस्य पती अनिल भगत यांच्या विरूद्ध असलेला विवाद अर्ज नामंजूर केला.

गुलाब अण्णासाहेब डोखे 15 जानेवारी 2021 रोजी झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव गटातून निवडणूक आलेले सदस्य आहेत. त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या मिळकतीवर अनधिकाराने अतिक्रमण केल्याची तक्रार केसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल भगत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या लेखी अर्जावर डोखे यांना म्हणणे सादर करण्याची संधी देत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून अतिक्रमणबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त करून घेतला होता.

यावर वेळोवेळी युक्तिवाद झाला. गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसून येते, असा अहवाल गटविकास अधिकारी यांनी दिला होता. या बाबीवरून ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ज-3) मधील तरतुदीनुसार सदस्य गुलाब डोखे यांना अपात्र ठरविणे उचित ठरत असून भगत यांचा विवाद अर्ज मंजूर करणे क्रमप्राप्त आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला तर दुसर्‍या प्रकरणात गुलाब डोखे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.

ग्रामपंचायतीच्या 2021 मधील निवडणुकीत आरती अनिल भगत या सर्वसाधारण महिला या सदस्यपदासाठी निवडून आल्या असून त्या सद्यस्थितीत उपसरपंच आहेत. त्यांचे पती अनिल बाबासाहेब भगत यांचे एकत्र कुटुंबाने केसापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मिळकतीवर अनधिकाराने अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधकाम करून विटा, सिमेंट पत्रा शेड उभे केले असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

यामध्ये डोखे, भगत यांचे लेखी म्हणणे, युक्तिवाद व राहुरीचे गटविकास अधिकारी यांचा अहवाल पाहून अतिक्रमणाबात साशंकता असून गटविकास अधिकारी यांचा अहवालही संदिग्ध स्वरूपाचा आहे. तसेच भगत कुटुंबियांनी अतिक्रमण केले असलेबाबत अर्जदार हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नसल्याने विवाद अर्ज नामंजूर करणे क्रमप्राप्त आहे, असा निकाल जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला.

विखे समर्थकांमध्ये जल्लोष

आरती अनिल भगत या केसापूर येथील कै. बाबासाहेब भगत यांच्या स्नुषा असून कै. भगत हे खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग केसापूरमध्ये आहे. त्यामुळे विखे समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

आपला न्यायदेवतेवर विश्वास असून जिल्हाधिकारी यांनी या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडे 15 दिवसांच्या आत अपिल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे लवकरच विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिक करण्यात येईल.

- गुलाबराव डोखे, ग्रामपंचायत सदस्य, केसापूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com