जिरायती भागातील केलवडला कष्टातून उभी राहिली द्राक्ष बाग!

जिरायती भागातील केलवडला कष्टातून उभी राहिली द्राक्ष बाग!

राहाता |महेंद्र जेजूरकर| Rahata

राहाता तालुक्यातील जिरायती टापूतील केलवड येथे शेतकर्‍यांनी द्राक्षे बाग फुलविली आहे. कष्ट करण्याची जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाने जिरायती भागातही द्राक्षे वेली उभ्या राहिल्या आहेत.

केलवड येथील भारत बबन राऊत व पर्बत बबन राऊत या दोन्ही भावांनी मोठ्या कष्टातून सहा एकर निर्यातक्षम द्राक्षांची बाग उभी केली आहे. पाऊस पडला, विहिरींना पाणी आले तर वांगे, भोपळे, कार्ले व भाजीपाला अशी पिके घेणार्‍या या शेतकर्‍यांनी द्राक्षे बाग उभी करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. भारत राऊत यांचे मित्र सुभाष गडगे व शिवाजी वाघे यांचे यामध्ये मोलाचे मार्गदर्शन मिळाले. गडगे आणि वाघे यांनीही आपल्या शेतात द्राक्ष बागांचा प्रयोग यशस्वी केला आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री असताना जिरायती भागासाठी राबविलेल्या कोरडवाहू शाश्वत शेती अभियानातून शेततळ्यांची योजना उभी राहिली. या योजनेच्या शेततळ्यामुळे जिरायती टापूतील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला. या शेततळ्यांच्या आधारावरच भारत आणि पर्बत राऊत या दोन्ही बंधुंनी 2018 साली सुरुवातीला 2 एकर द्राक्षबाग आपल्या शेतात उभी केली. पाणी कमी पडल्याने 2018 साली टँकरने पाणी आणून त्यांनी बाग जगवली. सव्वालाख रुपयांचे पाणी त्यांनी विकत घेऊन दोन एकर बाग जगवली. त्या दोन एकरात त्यावेळी त्यांनी 27 टन उत्पादन घेतले! सन 2019 मध्ये त्यांनी पुन्हा 4 एकर बाग लावली. पहिल्या दोन एकरांत सुपर सोनाका व नंतरच्या चार एकरांत एसएसएन या वाणाच्या द्राक्षांची लागवड त्यांनी केली. या कालावधीत त्यांनी एकूण दीड एकराचे शेततळे उभारले. यासाठी दोन विहिरींतून या तळ्यांमध्ये पाणी सोडले जाते.

या संपूर्ण सहा एकर बागेला ठिबकसिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन राऊत यांनी केले. गेल्या तीन वर्षांपासून पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने मोठा आधार मिळाला. सध्या त्यांच्या बागेवर निर्यातक्षम द्राक्ष लगडले आहेत. या महिना अखेरीस त्यांच्या बागेतील द्राक्षे परिपक्व होऊन काढणीस आलेले असतील. राऊत बंधुंनी व त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेले कष्ट, वेळोवेळी पाण्याचे केलेले व्यवस्थापन आणि औषधांच्या मात्रा वेळेवर देण्याच्या पध्दतीने त्यांना यंदा चांगले उत्पादन मिळू शकेल. त्यांच्या संपूर्ण बागेला त्यांनी तारेचे कुंपन केले आहे. त्यांना एकरी पाच लाखांपर्यंत संपूर्ण खर्च आला आहे. 70 ते 80 टन उत्पादन मिळू शकेल, असा त्यांचा अंदाज आहे. बागेवर क्वालिटी द्राक्षे लगडले आहेत.

आ. विखे पाटील राज्याचे कृषी मंत्री होते, त्यावेळी आणलेल्या कोरडवाहू शाश्वत शेती अभियान हे जिरायती भागात वरदान ठरले आहे. या अभियानातून शेततळे उभे राहिले व शेतकरी प्रयोगशील बनले. आधुनिक शेतीकडे जिरायती शेतकर्‍यांचा कल वाढला. आम्ही त्या योजनेतून अर्धा एकराचे शेततळे केले. त्यानंतर एक एकराचे तळे असे दीड एकराचे शेततळे उभे राहिले. विखे पाटील यांचे यासाठी मोठे प्रोत्साहन आहे.

- भारत राऊत, द्राक्ष उत्पादक शेतकरी

केलवडपासून काकडी विमानतळ अवघ्या 2 किमी अंतरावर आहे. जिरायती भागातील शेतकर्‍यांनी कष्टातून पिकविलेला दर्जेदार माल निर्यात व्हावा. तालुक्यातील शेतमालाची निर्यात व्हावी, असा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रयत्न आहे. हे जर झाले तर दळणवळणाच्यादृष्टीने केलवडला सोयीचे आहे. आ. विखे पाटील यांच्या दुरदृष्टीतून कारगो सेवा सुरु होईल. त्याबरोबरच कोल्ड स्टोरेज, पॅकिंग हाऊस सुरू होईल.

- बाळासाहेब सुधाकर गमे, प्रयोगशील शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com