चिलेखनवाडी ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा

मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
चिलेखनवाडी ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा, स्वतंत्र वीज कर्मचाऱ्याची नेमणूक करा, तसेच ऑक्सिजन भरण्यासाठी लागणारे रिकामे गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ना.गडाख यांनी आज सकाळी ११ वाजता चिलेखनवडी येथील मे.लोचनाबाई इंडस्ट्रीज प्रा.ली. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पहाणी करून उत्पादन, मागणी आणि पुरवठा, उत्पादनात येणाऱ्या अडचणी यांची माहिती घेतली.

ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक बजरंग पुरी यांनी ऑक्सिजन उत्पादनात येणाऱ्या अडचणी, वीज पुरवठा याबाबतची माहिती देतांना सांगितले की, हा ऑक्सिजन प्रकल्प प्रतिदिन ३ मेट्रिक टन क्षमतेचा असून दिवसभरात अडीच ते पावणे तीन मे.टन क्षमतेने चालतो. सद्यस्थितीत दिवसाला ४०० ते ४५० ऑक्सिजन सिलेंडर भरले जात आहे.

वीज पुरवठा एक मिनिटे जरी खंडित झाला तर सिस्टीम मधील ऑक्सिजन हवेत सोडून द्यावा लागतो अन्यथा त्याचा बर्फ तयार होण्याची शक्यता असते. अशी वेळ आली तर किमान 28 सिलेंडरचे नुकसान होते. हा ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवायचा झाल्यास २४ तास अखंडित वीज पुरवठा व रिकाम्या सिलेंडरची उपलब्धता आवश्यक आहे.

त्यावर ना.गडाख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना समक्ष सुनचा देऊन रिकामे सिलेंडरची व्यवस्था करणे तसेच २४ तास वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली व २४ तास अखंडित वीज पुरवठा कसा राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. असे केल्यास दिवसाला कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ७५ ऑक्सिजन सिलेंडर भरण्यात वाढ होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

भेंडा कोविड सेंटरला ही भेट..

ना.गडाख यांनी भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवासातील शासकीय कोविड केअर सेंटरला ही भेट दिली. तेथील सुविधांची माहिती घेतली. रुग्नालयातील करोना रुग्णांशी संवाद साधून वैद्यकीय उपचार, निवास व्यवस्था, देण्यात येणारे जेवण याबाबत प्रत्यक्ष रुग्णांकडूनच माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रामेश्वर शिंदे आदी उपस्थित होते. ऑक्सिजन प्रकल्पाचे संचालक आशिष पुरी, मंगेश पुरी, सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी मंत्री महोदयाचे स्वागत केले.

कुटुंब करोनाचे विळख्यात तरी मंत्री गडाख रुग्णांच्या मदतीसाठी धावले...

नेवासा विधानसभा सदस्य व राज्याचे मृद-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे स्वतः करोनाने आजारी आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य ही करोनाग्रस्त असतांनाही विशेषतः जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख हे पुणे येथे तर प्रशांत गडाख हे मुंबई येथे ऍडमिट आहेत. तरीही तालुक्यातील रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज त्यांनी तालुक्यातील करोना सेंटरला भेटी दिल्या व रुग्णांशी संवाद साधून अडी-अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com