तीन वर्षांत पथदिव्यांचा प्रकाशच पडला नाही!

केडगाव हद्दीतील प्रकार || नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
तीन वर्षांत पथदिव्यांचा प्रकाशच पडला नाही!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या केडगाव हद्दीत अरणगाव रस्त्यावरील जय गणेश कॉलनीत गेल्या तब्बल तीन वर्षांपासून महापालिकेकडून पथदिव्यांचा प्रकाशच पडलेला नाही. त्यामुळे रात्री अपरात्री नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्याने या कॉलनीत नुकतेच खांबावर एलईडी लटकविण्यात आले, मात्र तेदेखील बंदच आहेत. ग्रामीण भागातील डिपीवर महावितरण कनेक्शन जोडू देत नसल्याने व महापालिका प्रशासन त्याबाबत पर्यायी व्यवस्था करत नसल्याने सव्वाशे घरे असलेली ही कॉलनी मात्र अंधारातच राहिली आहे.

दरम्यान जय गणेश कॉलनीतील दिव्याखालच्या अंधाराला या भागातील जनता चांगलीच वैतागली असून, तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र वाव्हळ, अमोद नलगे, टी. एम. वाघमारे, निवृत्ती घोडके, रामदास वाल्हेकर आदी नागरिक व महिला उपस्थित होत्या. सदर जय गणेश कॉलनीमध्ये शंभर ते सव्वाशे घरांची लोकवस्ती असून, महापालिका हद्दीच्या सिमेवर ही कॉलनी आहे.

ओढ्याच्या पूर्वेकडील बाजू बुरुडगावमध्ये जाते तर पश्चिमेकडील बाजू केडगाव हद्दीत येते. या भागात असलेली डिपी ग्रामीणची असल्याने महावितरण महापालिकेला पथदिव्यांसाठी कनेक्शन जोडू देत नाही. महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकही नागरिकांच्या या अनेक वर्षांच्या रखडलेल्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न तसाच प्रलंबीत राहिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com