
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरात छापा टाकून 69 हजार 300 रूपये किंमतीची सुगंधी तंबाखु व मावा तयार करण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सहादू कोतकर (वय 27 रा. कोतकर मळा, केडगाव), विशाल संतोष भगत (वय 27 रा. आनंदनगर, स्टेशनरोड)व अक्षय बापु राहींज (रा. भुषणनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील सागर व विशाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केडगाव उपनगरातील पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी येथे एक इसम मावा विक्री करत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक शिंदे यांनी पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, अमोल गाडे, सुजय हिवाळे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता मावा बनविण्याचे लोखंडी मशीन, सुगंधी तंबाखू, तयार केलेला सुगंधी मावा, मोपेड दुचाकी असा 69 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तिघांविरूध्द भादंवि कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.