अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केडगावमधील अंबिकानगर येथे घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करीत कपाटातील सोने व रोख रक्कम अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली. यात 2 लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून, या प्रकरणीं धनंजय नारायण लोकरे (वय 39 वर्ष, धंदा अॅडव्होकेट, रा. अंबिका शाळेजवळ, अंबिकानगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन डिसेंबरला साडेआठच्या सुमारास जेवण झाल्यानंतर भाऊ निरंजन व आई शोभा हॉलमध्ये झोपी गेले. पत्नी, मुलगा व मी घराच्या गेटसमोर शेकाटी करुन शेकत बसलो. पत्नी कविता साडेअकराच्या सुमारास घरात गेली असता बेडरुमधील कपाटाचे दार उघडे दिसले. तसेच कपाटातील सामानाची उचकापाचक केल्याचे आढळून आले.
कपाटातील सोने, चेक बूक, महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये 1 लाख 44 हजार रुपये किमतीचे 41 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 25 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे लटकन, 16 हजार रुपयांची अंगठी, 9 हजार रुपये किमतीची अंगठी, 18 हजार रुपये किमतीची अंगठी, 9 हजार रुपयांच्या सोन्याच्या बाळ्या, 8 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.