हनीट्रॅप : केडगावचा अविवाहीत युवक महिलेच्या जाळ्यात

युवकाच्या आईची पोलिसांत फिर्याद
हनीट्रॅप : केडगावचा अविवाहीत युवक महिलेच्या जाळ्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेने एका अविवाहीत युवकाला जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवून त्याचे चित्रिकरण केले. तिने स्वत: च्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी चित्रिकरण, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्या युवकाकडे वेळोवेळी पैशाची मागणी केल्याचा ‘हनीट्रॅप’चा नवीन प्रकार नगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी ‘त्या’ युवकाच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधित विवाहित महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगावात राहणारा अविवाहीत युवक हा गेल्या अनेक दिवसांपासून एका महिलेच्या संपर्कात आहे. त्या युवकाच्या आईच्या मालकीचे एक घर नगरमध्ये असल्याने त्याच घरात भाडेकरू म्हणून संबंधित महिला राहत होती, तेव्हापासून त्या युवकाचे अन् तिचे जवळचे संबंध आले. याच काळात त्यांनी केलेल्या गैरकृत्याचे चित्रिकरण त्या महिलेने केले होते. चित्रिकरण, फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत, तिने युवकाचा पैशासाठी उपयोग सुरू केला. तसेच, तो कायमस्वरूपी तिच्या छायेत राहावा, यासाठी तिने युवक राहत असलेल्या घराच्या गॅलरीत जादूटोणा करण्याच्या उद्देशाने लिंबू आणि टाचण्या आणून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलगा पाहिजे असेल तर फ्लॅट व तुझ्या नावाने असलेली जमीन तुझ्या मुलाच्या नावावर करून दे, नंतर मी माझ्या नावावर करून घेते, असे तिने त्याच्या आईला सुनावले. युवकाने आतापर्यंत मोबाईल, लॅपटॉपसह मोठी रक्कम तिच्या हवाली केल्याचे समजते. अखेर युवकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेवर जादूटोणाविरोधी कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com