लुटमार करणारी केडगावची टोळी जेरबंद

कोतवाली पोलिसांची कामगिरी
लुटमार करणारी केडगावची टोळी जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

वाहन चालकाला मारहाण करून वाहन पळवून नेणारी केडगावची टोळी कोतवाली पोलिसांनी 24 तासात जेरबंद केली. गौरव राजेंद्र शेवाळे (वय 22), शरद चंदु पवार (वय 22), राहुल रामचंद्र बोरुडे (वय 25 सर्व रा. केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन बालाजी लेडवे (वय 24 रा. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादी पुणे येथून त्यांच्या कारने नगर येथे प्रवासी सोडण्यासाठी आले होते. मंगळवारी रात्री पुणे येथे जाताना ते कायनेटीक चौकात थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील चार हजार रूपये व त्यांची कार लंपास करून पोबारा केला होता. फिर्यादी यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने लुटमार करणार्‍या टोळीचा शोध सुरू केला.

लुटमार करणारे सर्व केडगावातील असल्याची माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची कार हस्तगत करण्यात आली आहे. उपनिरीक्षक मनोज कचरे, उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सागर पालवे, नितीन गाडगे, शाहीद शेख, बंडु भागवत, सुजय हिवाळे, तान्हाजी पवार, सुमित गवळी, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, भारत इंगळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com