केडगाव उपनगरात ‘मावा’ उद्योगावर छापा

सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त: कोतवाली पोलिसांची कारवाई
केडगाव उपनगरात ‘मावा’ उद्योगावर छापा

अहमदनगर|Ahmedagar

केडगाव (Kedgav) उपनगरात सुगंधी तंबाखू (Aromatic Tobacco), सुपारी (Betel Nut) व इतर साहित्याचा वापर करून मशीनवर मावा (Mava) तयार करण्याचा उद्योग सुरू होता. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) सदर ठिकाणी छापा (Police Raid) टाकला आहे. यामध्ये चार लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला असून तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) भादंवि कलम 328, 272, 273, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे.

मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील मजनु शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे पसार झाले आहेत. केडगाव उपनगरातील वैष्णवीनगर भागात एका घराच्या परिसरात काही इसम सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्याचे मिश्रण करून मशीनवर मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, राजु शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. त्याठिकाणी एक टेम्पो, सुगंधी तंबाखू, मावा बनविण्याचे मशीन, बारीक सुपारी, चुना असा चार लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com