कातनदीला पाणी आल्याने शेळके वस्तीचा गावाशी संपर्क तुटला, मुलांची शाळाही बंद

कातनदीला पाणी आल्याने शेळके वस्तीचा 
गावाशी संपर्क तुटला, मुलांची शाळाही बंद

आडगाव |वार्ताहर| Aradgav

राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील कात नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या शेळके वस्तीवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. मुलांना शाळेत पाठविता येत नाही. तर जनावरांचा चारा व दूध कसे पाठवायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाशी वारंवार संपर्क करूनही काही उपयोग होत नसल्याच्या भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

गेल्या तीन वर्षापासून कात नदीला पाणी आल्यानंतर येथील नागरिकांची रस्त्याची मोठी अडचण होत आहे. याबाबत वारंवार विनंती, अर्ज करूनही दखल घेतली जात नाही. यंदा गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच मुसळधार पाऊस झाल्याने आडगाव येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यातून पाणी सुरू झाल्याने नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले. येथील वस्तीवर 10 ते 15 घरे असून 100 च्या आसपास लोकवस्ती आहे. जनावरांची संख्या मोठी आहे. येथील शेतकर्‍यांना रस्ता नसल्यामुळे दैनंदिन अडचणी येत असून मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.

परंतु जनावरांना चारा कसा आणणार, दूध डेअरीला कसे पोहच करायचे, आजारी रुग्णाला दवाखान्यात कसे न्यायचे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गत तीन वर्षांपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे पाणी किमान फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पाच महिने येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्यांना तोड द्यावेे लागते. याबाबत तालुका प्रशासनाशीही संपर्क केला. मात्र अद्याप काही हालचाली होताना दिसत नाहीत. नदीच्या एका बाजूने जिल्हा परिषदेचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून तीन मोर्‍यांचा छोटा पूल बनविल्यास येथील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मात्र याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com