कार्तिक वद्य एकादशीनिमित्त नेवाशात दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांचे दर्शन

कार्तिक वद्य एकादशीनिमित्त नेवाशात दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांचे दर्शन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पैस खांबाचे दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पायी आलेल्या शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावत ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष केला.

पहाटे 4 वाजता संत ज्ञानेश्वर मंदिराचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे व मनिषा घाडगे यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य उदयन सभारंजक यांनी केले.

मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, मार्तंड महाराज चव्हाण, राम महाराज खरवंडीकर, समर्पण फाऊंडेशनचे डॉ.करणसिंह घुले, सेवेकरी शिवाजी होन, देवराव बनकर,गोरख भराट, संदीप आढाव, राजेंद्र परबळकर उपस्थित होते.

पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले.भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता यावे म्हणून संस्थानच्यावतीने मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

गुरुवर्य बन्सीमहाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी सेवेकर्‍यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली. दिंड्यांचे शिवाजी महाराज देशमुख यांनी स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर उद्यानात संत ज्ञानेश्वर माऊली व सच्चीदानंद बाबांचे शिल्प पहाण्यासाठी माऊली भक्तांनी उद्यानात मोठी गर्दी केली होती. मंदिर प्रांगणापासून शहराकड़े जाणार्‍या रस्त्यांवर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री मोहिनीराज मंदिर येथील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर वाघ यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, दत्त मंदिर, सदगुरू बन्सी बाबा समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती.

पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकांत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले. किर्तनानंतर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक मेजर साहेबराव घाडगे पाटील यांच्यावतीने शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com