नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

करोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द करण्यात आल्याने लाखो वारकर्यांच्या गर्दीने फुलणारी

नेवासा नगरी काल ओस पडली होती. पहाटे माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालून आरती करण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील मुख्य प्रवेशद्वारासह मंदिरही बंद ठेवण्यात आले होते. फक्त पहाटे वेदमंत्राच्या जयघोषात माऊलींच्या पैस खांबास अभिषेक करण्यात आला.

दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री नेवासा येथे कार्तिक वद्य एकादशीला यात्रा भरत असते. सुमारे तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येथे येत असतात मात्र देवस्थान विश्वस्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्तिक वद्य यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी पहाटे 4 वाजता माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैसखांबास बबबराव पिसोटे, कृष्णा पिसोटे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला व आरती करण्यात आली. पौरोहित्य पांडुरंग जोशी यांनी केले.

यावेळी मार्तंड चव्हाण, चांगदेव कर्डीले, मयूर डौले, गोरख भराट, भैय्या कावरे उपस्थित होते.यात्रा रद्द करण्यात आली असल्याने मंदिर रस्ते ओस पडलेले दिसत होते तर मंदिर दर्शन बंद असल्याने काही भाविक श्रद्धेने मंदीराच्या बाहेरूनच दर्शन घेताना दिसत होते. बाजारपेठेसह मंदिर रस्त्यावर नेहमी होणारी गर्दी यावेळी दिसून आली नाही.