कर्जत : दोन युवकांचा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू
सार्वमत

कर्जत : दोन युवकांचा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू

Arvind Arkhade

कर्जत|वार्ताहर| karjat

कर्जत तालुक्यातील रातंजन येथील तेजस सुनील काळे (वय 15) व सिद्धांत विजय काळे (वय 16) हे दोघे नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कर्जत तालुक्यामध्ये निमगाव गांगर्डा याठिकाणी असलेले सीना धरण सध्या ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. यामुळे सांडव्यामधून पडणारे पाणी सीना नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेले आहे. यामुळे तालुक्यातील सीना नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

तालुक्यातील रातंजन या गावाजवळ सीना नदीचे पात्र आहे. नदीस पाणी आलेले पाहून तेजस सुनील काळे (वय 15) व सिद्धांत विजय काळे (वय 16) हे दोघे नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले तर नदीपात्रामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज या दोन्ही मित्रांना आला नाही. खड्ड्यांमध्ये पाणी जास्त होते. दोघेजण त्या खड्ड्यांमध्ये गेले असता खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

सीना नदी पात्र पूर्णपणे कोरडे पडले होते यामुळे रातंजन घुमरी यासह तालुक्यातील नदीपात्रात सर्वत्र वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला आहे. वाळू उपसा करताना मोठी खड्डे सर्वत्र पडली आहेत. अशाच प्रकारे रातंजन या ठिकाणी देखील वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा त्याठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत्यूनंतर त्या दोघांचे मृतदेह नागरिकांनी बाहेर काढून मिरजगाव येथील रुग्णालयांमध्ये आणले होते. या घटनेनंतर विलास नाना काळे यांनी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे या घटनेची खबर दिली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com