
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत येथील एका महिला सावकाराने वसुल केलेल्या सुलतानी व्याजाच्या रकमेच्या आकडयाने पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुद्दल म्हणुन दिलेल्या 20 हजारांच्या रकमेपोटी तब्बल 5 लाख रुपयांचे व्याज देऊनही या महिला सावकाराचे समाधान झाले नाही. कोरोनाच्या काळात व्याजाची रक्कम देऊ न शकणार्या एका कापड व्यापार्याला व्याज व मुद्दलीच्या रकमेसाठी चक्क शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना घडली आहे.
वैशाली विजय राऊत व तिचा मुलगा (रा.राशीन ता.कर्जत) अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी भगवान अर्जुन काकडे (रा.काकडेगल्ली, कर्जत) यांच्या फिर्यादिवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून सन 2000 साली परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी वैशाली राऊत हिच्याकडून 20 हजार रुपये 5 रुपये टक्के दराने घेतले होते.
फिर्यादीने व्याजापोटी दर महिन्याला 2 हजार रूपये देण्याची बोली होती. तसेच व्याजावर व्याज अकारणी करत ही रक्कम तब्बल पाच लाख रूपयांपर्यंत गेली होती. 2019 पासून कोरोना महामारीमुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने व फिर्यादीच्या मुलीचे शिक्षण सुरू असल्यान काकडे सावकाराला व्याज देऊ शकले नाहीत. यावरून 27 जून रोजी फिर्यादी कर्जतच्या बाजारात असताना माझे पैसे परत दे असे म्हणत महिला सावकाराने शिवीगाळ दमदाटी करून सर्वांसमोर गोंधळ घालून राडा घातला.
त्यानंतर 4 जुलै रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी बाजारात जात असताना त्यांना अडवून मव्याजाचे पैसे व मुद्दल देफ असे म्हणत महिला सावकार राऊत व तिच्या मुलाने शिवीगाळ करून मारहाण केली.त्यावेळी काकडे यांची पत्नी सोडवण्यास आली असता तिलाही शिवीगाळ मारहाण केली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. व्याज देऊनही सावकार महिला वारंवार व्याजाच्या रकमेसाठी त्रास देत असल्याने काकडे यांनी दोघांविरोधात कर्जत पोलिसात अखेर फिर्याद दिली आहे. कर्जत पोलिसांनी महिला सावकार व तिच्या मुलाविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलम 39 नुसार तसेच इतर गुन्हे दाखल केले आहेत.