कर्जतला पुढील चार दिवस पाणीपुरवठा बंद

कर्जतला पुढील चार दिवस पाणीपुरवठा बंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेचा वीज पंप जळाल्यामुळे कर्जत शहराचा पाणीपुरवठा आजपासून चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती नगर पंचायतच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

कर्जत शहराला खेड तालुका येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणारा वीज पंप जळाल्यामुळे पुढील चार दिवस म्हणजे 26 ऑगस्टपर्यंत कर्जत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याच महिन्यातही अशाच पद्धतीने वीज पंपाचा बिघाड झालेला होता त्यावेळी देखील शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला होता. कर्जत नगरपंचायत स्थापन झाल्यापासून शहराचा पाणीपुरवठा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता. अपवादात्मक परिस्थिती वगळता पाणीपुरवठा बंद राहत नव्हता मात्र सध्या वीज पंप जळाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारा वीज पंप यामध्ये सातत्याने बिघाड होत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर माहिती अशी मिळाली की, हे वीज पंप जवळपास पाच वर्षांपेक्षा जास्त जुने झाले आहेत. 24 तास सातत्याने या पंपाचा पाणी उपसा करून सोडण्यासाठी वापर होतो. असे दोन शक्तिशाली पंप नगरपंचायतकडे आहे. मात्र दोन्हीही पंप आता जुने झाल्यामुळे त्याच्यामध्ये सातत्याने बिघाड होत आहे. यामुळे जुन्या पंपाची दुरुस्ती आणि यासाठी होणारा खर्च हा मोठा आहे हे सर्व पहाता नगरपंचायत ला आता नवीन पंप खरेदी करावा लागणार आहे.

एका वीज पंपाची किंमत अंदाजे 25 ते 30 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. यामुळे तेवढ्या रकमेची तरतूद करून किंवा अन्य मार्गाने पैसे उपलब्ध करून नवीन वीज पंप खरेदी करावे लागणार आहेत. नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com