राजकीय कुरघोड्यांनी गाजतेय कर्जत नगरपंचायत निवडणूक

आमदार पवारांचे भाजपला अखेरपर्यंत धक्क्यावर धक्के
राजकीय कुरघोड्यांनी गाजतेय कर्जत नगरपंचायत निवडणूक

कर्जत तालुका वार्तापत्र | किरण जगताप

कर्जत नगरपंचायत निवडणूक जिल्ह्यात तसेच राज्यभरात राजकीय कुरघोड्यांनी गाजली. या कुरघोडीत राजकीय पटलावर आमदार रोहित पवार यांचे पारडे जड राहिले. मुळात नगरपंचायतीच्या कित्येक महिने अगोदरपासून पवारांनी भाजपचे मोहरे आपल्याकडे वळवून धक्के देणे सुरू केले होते. परंतु अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी भाजपचे भरवश्याचे उमेदवार माघार घेत असल्याचे चित्र पाहून प्रा. राम शिंदे तसेच भाजपा अवाक झाली. तर आ. पवारांबाबत नातवाने अजोबांचे गुण घेत खेळी केल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसली.

नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठे नाट्य पहावयास मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे प्रा.राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत प्रा. शिंदे यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचे चित्र होते. प्रारंभीच अनेक उमेदवार राष्ट्रवादीत दाखल झाल्याने भाजपा बॅक फूटवर गेली. नगरपंचायतीतील भाजपाच्या ताब्यात असलेली सत्ता हस्तगत करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जोराची ताकद लावली. अंतिम टप्प्यात काँग्रेसला जवळ घेण्यात त्यांना यश आले.

शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्याने महाविकासआघाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कर्जतमधील बडे नेते गळाला लागल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड होत गेलेे. आमदार रोहित पवार हे दडपशाही करून भाजपाचे उमेदवार राष्ट्रवादीत दाखल करून घेत असल्याचा आरोप प्रा. राम शिंदे आणि भाजपाकडून करण्यात आला. इतकेच नाही तर काही प्रभागांमधील निवडणूक थांबविण्याची मागणी करत प्रा. शिंदे यांनी अर्ज माघारीच्या दिवशी आंदोलनही केले. प्रचारातही याच प्रकारावरून भाजप आरोप करत उखाळ्या पाखाळ्या काढत राहिली. तर पवार विकासाची स्वप्ने कर्जतकरांना दाखवत होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कशाप्रकारे दबाव आणला त्याचे व्हिडिओ मतदानाच्या दिवशी व्हायरल करून राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. त्याचा मतदानावर कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रवादीकडून भाजपाला निवडणुकीच्या पूर्वी जोरदार धक्के देण्यात आले. आता ओबीसी आरक्षणामुळे बाकी राहिलेल्या 4 जागांसाठी दुसर्‍या टप्प्यात निवडणूक होत आहे. त्याही निवडणुका मोठ्या लक्षवेधी ठरणार आहेत. या दुसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून भाजपाला असेच धक्के दिले जाणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पहिल्या टप्प्यात बोध घेतल्याने भाजपाची यंत्रणा अधिक दक्ष झालेली आहे. आ. पवार आणि शिंदेंसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com