
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत होते.
त्यामुळे अनेक प्रश्न सुटले असून सुटलेल्या प्रश्नांची घोषणा होण्याची औपचारिकता राहिली असल्याची माहिती आ. पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. यात एसटी आगारासह एमआयडीसी या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये झाली. यावेळी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन धांडे, विजय मोढळे, सुरेश शिंदे, संग्राम पाटील, सुनील शेलार, संदीप बोराडे, अशोक जायभाय, संजय सुद्रिक, शहाजीराजे भोसले, रघुनाथ काळदाते, बाळासाहेब सपकाळ, देविदास गोडसे, माऊली सायकर, ऋषिकेश धांडे, जाकिर सय्यद, रज्जाक झारेकरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी आ. पवार म्हणाले, कर्जत-जामखेड तालुक्यातील अनेक प्रश्न जिव्हाळ्याचे प्रलंबित होते. त्या सर्वांचा सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे हे प्रश्न सुटले आहेत. केवळ त्याच्या घोषणेची औपचारिकता आहे.
यात कर्जत एसटी आगार मंजूर झाले आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून याच परिसरात व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक युवकांसाठी रोजगार मिळावा म्हणून एमआयडीसी सुरू करण्यात येत आहे.
त्याचा अहवाल तयार झाला असून या महिन्यात त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कर्जत दादा पाटील महाविद्यालयाच्या परिसरात पाच कोटी रुपयांचे भव्य असे सभागृह उभे करण्यात येत आहे त्याचे काम लवकरच सुरू करीत आहोत.
महिलांचेही संघटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महिला काँग्रेसची तालुकास्तरीय समिती तयार करण्यात येणार आहे. याच धर्तीवर गावागावांत महिलांची समिती राहणार असून या समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
प्रत्येक गावात विकास समिती
मतदारासंघातील प्रत्येक गावात विकास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील प्रलंबित समस्या या विकास समितीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येणार असून तातडीने त्या सोडविण्यात येणार आहेत. याशिवाय भविष्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करताना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची योग्य दखल घेऊन पक्ष संघटनेमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांच्या सूचना प्राधान्यक्रमाने सोडवण्यावर भर दिला जाईल.