कर्जतला शिवसेना-भाजप वाद टोकाला

भाजप जिल्हाध्यक्ष मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
कर्जतला शिवसेना-भाजप वाद टोकाला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्याचे तीव्र पडसाद कर्जत तालुक्यामध्ये उमटले आहेत. सेनेच्या वतीने मुंडे यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिणामी शिवसेना व भाजप मधील वाद टोकाला गेला आहे.

शिवसेनेच्यावतीने आज कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देऊन अरुण मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख बळीराम यादव, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव व शिवाजी नवले, अक्षय घालमे, रवींद्र खेडकर, अक्षय तोरडमल, पोपट धनवडे, अमोल सुपेकर, पांडुरंग जठार, अनिल दरेकर, सागर सुर्वे, दीपक मरळे, किरण सुपेकर, भाऊसाहेब गुंड, शाहीद झारेकरी, बाबा केसकर, दिनेश थोरात, चेतन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आज सकाळी सर्व शिवसैनिक एकत्र आले व त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन दिले. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल त्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

मुंडे यांना कर्जत तालुका बंद

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अरुण मुंडे यांना कर्जत तालुका प्रवेश बंद केला आहे. एवढे करूनही त्यांनी जर प्रवेश केला तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊन त्यांना परत पाठवू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com