
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील बहिरोबावाडी येथे एकाच रात्रीत तीन शेतकर्यांच्या बांधावरील चंदनाची झाडे चोरणार्या दोन चंदन चोरांना कर्जत पोलीसांनी जेरबंदही केले आहे.
अशोक जाधव (33, रा. कोरेगाव, ता. कर्जत), अस्लम चाँद पठाण (33, रा. म्हसोबा गेट कर्जत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संजय लाळगे (रा. बहिरोबावाडी) यांनी याप्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांची एक एकर क्षेत्रात चंदनाची 360 झाडे आहेत. याच शेताच्या बांधावरील 6 झाडांपैकी दोन झाडे 20 जून रोजी चोरट्यांनी कापून नेली होती. फिर्यादी लाळगे यांनी बहिरोबावाडी गावातील सुनिल यादव यांचे देखील एक चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
राहुल रामचंद्र शिंदे यांच्या शेतातीलही एका झाडाचे चोरट्यांनी कापून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तालुक्यातील विविध ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी करून संशयित त्याची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्यांना शिताफीने जेरबंद केले. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील आणखी काही संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, उद्धव दिंडे, सुनील खैरे, गोवर्धन कदम, जयश्री गायकवाड आदींनी ही कामगिरी केली आहे.