
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत-राशीन रस्त्यावर बेलवंडी शिवारामध्ये दुचाकी व चारचाकी गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) दुपारी घडली. या मार्गाने कार्यक्रमासाठी जात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी अपघात पाहताच ताफा थांबवून अपघातग्रस्तांची चौकशी केली तसेच त्यांना पूर्ण मदत करण्याच्या सूचना पदाधिकार्यांना केल्या.
जगदीप बापू मोरे (रा. वरठाण, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर, मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जतवरून राशीन कडे जात असणारी दुचाकी (क्रमांक एमएच 23 यू 4539) ची आणि समोरून येत असलेली चारचाकी गाडी (क्रमांक एम एच 16 सी. डी. 3759) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जगदीप बापू मोरे, राहणार वरठाण, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद हा जागीच ठार झाला. दोन्हीही वाहनांची समोरासमोर धडक झाल्यानंतर जोरदार आवाज झाला, आवाजामुळे नागरिक त्याठिकाणी धावत आले परंतु तोपर्यंत जगदीप मोरे हा रस्त्याच्या खाली दुचाकीवरून फेकला गेला होता आणि रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला.
शरद पवार यांनी संकटातील व्यक्तींना मदत करण्याची परंपरा यावेळी देखील कायम राहिली. याच रस्त्याने घोगरगाव कडे शरद पवार यांच्या गाडीचा ताफा जात असताना ताफा थांबवून ते घटनास्थळी थांबले. त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली संबंधित व्यक्तीला रुग्णालयात नेले आहे का? तिथे डॉक्टर आहेत का? आणि त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ निरोप द्या, अशा सूचना आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देतानाच अपघात कसा झाला, काय झालं याची सखोल माहिती शरद पवार यांनी घेतली आणि संबंधितांना सर्वांनी मदत करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.