खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत

आ. रोहित पवार : राम शिंदे यांना सुनावले खडेबोल
खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत

अहमदनगर (प्रतिनिधी)

राम शिंदे साहेब, खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत. पुड्या सोडू नका, हिंमत असेल तर पुरावा द्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेंना खडेबोल सुनावलेत. याचवेळी आ. पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

नुकतंच आ. राम शिंदेंनी रोहित पवारांबाबत एक विधान केलं होतं. त्यात त्यांनी तानाजी सावंत यांना मतदारसंघात येऊ नका म्हणून आ. पवारांनी 10 फोन केले होते, असं म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानाचा समाचार घेण्यासाठी आ. पवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आपली भूमिका स्पष्ट करतानाच तानाजी सावंत आणि राम शिंदे दोघांनाही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आ. पवारांनी म्हटलंय, ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? असा सवाल विचारत आ. पवार यांनी थेट राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तर पुढे, आ. शिंदे साहेब पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत. हिंमत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा..मग मैदानात बघू! असं आव्हान रोहित पवारांनी राम शिंदे यांना दिलं आहे.

दरम्यान, याआधीही तानाजी सावंत यांनी काहींना वाटतं, धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ, असं थेट नाव न घेता नगरमध्ये जाऊन रोहित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे आ. पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तानाजी सावंतांसोबतच राम शिंदेंचाही चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com