सलग दुसर्‍या दिवशीही कर्जतकर अंधारातच

नगरपंचायतीकडे बिल भरण्यासाठी पैशांची वाणवा
वीज
वीज

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायतीकडे विजेची थकबाकी राहिल्यामुळे महावितरण कंपनीने शहरातील बहुसंख्य स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बुधवारी (दि.23) कापलेे आहे. यामुळे शहरात रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याचा धक्का बसल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने धावपळ केली मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी कर्जतकरांना अंधारात राहावे लागले.

महावितरण कंपनीची वसुली मोहीम सुरू झाली आहे. कर्जत नगरपंचायत कडे लाखो रुपयांची थकबाकी झाली आहे, नगरपंचायतने बाकी भरली नाही यामुळे महावितरण कंपनीने कारवाई सुरू केली आहे. शहरातील ज्या स्ट्रीट लाईटवर मीटर बसवलेले आहेत ते सर्व महावितरण कंपनीने बंद केले आहे. मात्र ज्या स्ट्रीट लाईट डायरेक्ट आहेत त्या मात्र सुरू होत्या. दुसर्‍या दिवशीही स्ट्रीट लाईट न लागल्यामुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यावर आजही अंधार होता.

या अंधारामुळे महिला मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, महिला व लहान मुलांना सहन करावा लागत आहे. स्ट्रीट लाईट नसल्याने रस्त्यांवर अपघातांचीही शक्यता आहे. तर या अंधाराचा चोरट्यांनी गैरफायदा उचल्यास नागरिकांना अर्थिक तोटाही सहन करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना विचारले असता सध्या नगरपंचायतीच्या तिजोरीत अवघे काही हजार शिल्लक असून वीज बिल मात्र लाखो रुपयांचे देणे असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून यातून नक्की मार्ग काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com