कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आघाडी, युतीचा घोळ कायम

सर्व पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू, एकही अर्ज नाही
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आघाडी, युतीचा घोळ कायम

कर्जत |शहर प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप आघाडी, युतीचा घोळ कायम असून सर्व पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून दररोज गुप्त खलबते होत आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया एक डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज गुरुवारी दुसरा दिवस होता. मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती प्रशासक प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली.

आज दुसरा दिवस असूनही निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. हा पॅटर्न कर्जत नगरपंचायतमध्ये अस्तित्वात येणार की नाही हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. जागावाटपाचा घोळ या तिन्ही पक्षांमध्ये कायम असल्याचे चित्र आहे. तसेच भाजपची भूमिका देखील अजूनही गुलदस्त्यात आहे. राज्यामध्ये भाजपबरोबर असलेली मित्रपक्ष कर्जत नगरपंचायतमध्ये त्यांच्यासोबत जाणार का हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती देखील अद्याप घेतलेल्या नाहीत. वंचित आघाडी, बहुजन समाज पक्ष या पक्षाच्या उमेदवार्‍या जाहीर झालेल्या नाहीत. यामुळे सर्व पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी आहे की नाही अजूनही संभ्रमात असल्याचे दिसून येते.

तीन दिवसांत उडणार गोंधळ

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर ही आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले असून त्यामध्ये दोन दिवस शासकीय कामकाज बंद राहणार आहे . यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. यामुळे शेवटच्या तीन दिवसांत अर्ज भरण्यासाठी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com