
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
श्री कर्जत येथील एमआयडीसीसाठी अधिसूचना जाहीर करून इतर कायदेशीर बाबींना गती मिळावी असे साकडे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योगमंत्र्यांशी उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना घातले.
कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी महत्त्वाच्या असणार्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीबाबत कायदेशीर बाबींना गती मिळावी आणि अधिसूचना जाहीर व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भू-निवड समितीने पाहणी करून जागेचे ड्रोन सर्वेक्षण देखील केले होते व 14 जुलै 2022 च्या 143 व्या उच्चाधिकार समितीची सर्वात मोठी बैठक पार पडून बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने मान्यताही दिली होती. त्यानंतर मान्यता असताना देखील अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही.
ही बाब यापूर्वी 2022 च्या हिवाळी अधिवेशनातही आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या कामकाजात उपस्थित केली होती. त्यावेळी मंत्री महोदयांनी अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत अधिसूचना निर्गमित करून जानेवारी महिन्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कर्जत येथील औद्योगिक क्षेत्र उभारणी करिता शासनाच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील असे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही त्यावर कोणती ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तसेच यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याकडे आमदार रोहित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. हीच बाब आता पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. मंत्री महोदयांना केली आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये औद्योगिक वसाहतीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.