
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती, उपसभापती पदाची निवड 11 जून या दिवशी होणार आहे. या निवडीची तारीख आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश कदम यांनी लेखी अजंठा प्रसिद्ध करून जाहीर केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत येथील सभागृहामध्ये ही निवड होणार आहे. यासाठी नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलवण्यात आली आहे.
यामध्ये नामनिर्देशक पत्र वाटप व स्वीकृती दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत. छाननी 1.30 ते 1.45, वैद्य यादी प्रसिद्ध 2 वाजता, अर्ज माघार घेण्यासाठी 2.15 पर्यंत मुदत राहील. अंतिम उमेदवारी 2.20 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास मतदान प्रक्रिया 2. 25 ते 3 वाजेपर्यंत, आवश्यक वाटत असल्यास मतमोजणी प्रक्रिया 3 ते 3.15 पर्यंत व निवडून आलेल्या पदाधिकार्यांच्या निकाल दुपारी 3.30 ला जाहीर करण्यात येणार आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांना प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत. दोन्हीकडचे नवनिर्वाचित संचालक तीर्थयात्रेला गेलेले आहेत. दोन्हीही गटांना समान जागा असल्यामुळे कोण बाजी मारणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. सदस्य संख्या समान आहे यामध्ये जर फूट पडली नाही तर देवी चिठ्ठी कोणाच्या नावाची निघणार याविषयी चर्चा सुरू आहे.