कर्जत बाजार समितीत ‘मविआ’ला धक्का

समान संचालक असताना सभापती, उपसभापती भाजपचे
कर्जत बाजार समितीत ‘मविआ’ला धक्का

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार व महाविकास आघाडीला धक्का दिला. समान संचालक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मते फुटली आणि सभापती व उपसभापती पदी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला.

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक काल रविवारी झाली. सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून काकासाहेब तापकीर तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून गुलाब तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. उपसभापती पदासाठी भाजपकडून आबासाहेब पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून अ‍ॅड. हर्ष शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.

छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरले. मतदानात सभापती पदासाठी भाजपचे काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे गुलाब तनपुरे यांना आठ मते मिळाली. महाविकास आघाडीचे एक मत बाद झाले. यामुळे सभापती पदासाठी भाजपचे काकासाहेब तापकीर की एक मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

यानंतर उपसभापती पदासाठी भाजपचे अभय पाटील व महाविकास आघाडीचे अ‍ॅडवोकेट हर्ष शेवाळे यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये भाजपचे अभय पाटील यांना दहा मते मिळाली एकूण मतांपेक्षा एक मत त्यांना जास्त मिळाले तर शेवाळे यांना आठ मते मिळाली. यामध्ये महाविकास आघाडीचे एक मत फुटले व भाजपचे अभय पाटील यांचा दोन मतांनी विजयी झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये निवडणूक घेण्यात आली यावेळी कार्यालयाच्या बाहेर भाजप व महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. निकाल जाहीर होताच भाजपने जल्लोष केला. आमदार राम शिंदे यांचा आगमन झाल्यानंतर त्यांची कर्जत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मत बाद झाले की केले

सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नऊ संचालक एका संचालकाने मतदान करताना काकासाहेब तापकीर व गुलाब तनपुरे या दोघांनाही शिक्के मारले आहेत. मतदान करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाची सर्व पद्धत समजून सांगितलेली असताना देखील हे मत बाद झाले. यावरून हे मत बाद करण्यात आले अशी चर्चा सुरू आहे. तर उपसभापती पदासाठी सरळ एक उमेदवार फुटल्याने चर्चेला उधान आले आहे. तर इतरही काही संचालकांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com