कर्जत बाजार समितीसाठी आज फेरमतमोजणी

जिल्ह्यासह राज्याचे लागले लक्ष
कर्जत बाजार समिती
कर्जत बाजार समिती

कर्जत |प्रतिनिधी|Karjat

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नऊ जागांसाठी सोमवारी (दि.22) फेर मतमोजणी होणार आहे. या फेर मतमोजणीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी संस्थेच्या मतदारसंघामधून भरत पावणे व ग्रामपंचायत मतदार संघामध्ये लीलावती बळवंत जामदार यांनी फेर मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी दोन्हीही मतदार संघातील सर्व उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी व सचिव यांना प्रतिवादी केले होते.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी निकाल देताना म्हटले होते की, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियम 2017 चे नियम बहात्तर दोन अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अर्जदार लीलावती बळवंत जामदार व भरत पावणे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यांच्या अर्जाचा विचार करून फेर मतमोजणी अंतिम निवडणूक निकाल घोषित करणे उचित ठरले असते. तथापी निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था महिला राखीव मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघ यामधील दिलेला निकाल वैध ठरविणे योग्य होणार नाही.

महिला राखीव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघाची फेर मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांनी 22 मे या दिवशी पूर्ण करावी व मतदार संघाचा निकाल जाहीर करावा. फेर मतमोजणीसाठी आवश्यक असणारी प्रत्येकी 50 हजार रुपयांची अनामत रक्कम फेर मतमोजणीच्या एक दिवस अगोदर भरणा करावी असा निकाल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला होता.

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही प्रामुख्याने आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या मधील टोकाचा संघर्ष दाखवणारी निवडणूक झाली आहे. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत दोघांनाही समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामुळे सेवा सहकारी संस्थेच्या सात जागा व महिला मतदार संघाच्या दोन जागा अशा नऊ जागांसाठी ही फेर मतमोजणी आज सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये होणार आहे.

सर्वसाधारण सात जागांसाठी 17 उमेदवार असून महिला मतदारसंघाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत. या फेेर मतमोजणीमध्ये 21 उमेदवारांचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. या फेरमतमोजणीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतमोजणीमध्ये काही बदल होणार का की असे चित्र राहणार की आता निकालानंतर स्पष्ट होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com