
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला असून तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना भाजपच्या पॅनलमधून उमेदवारी मिळाली आहे. यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्ष सदस्य व तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आता उतरले आहे. यामुळे काही जागांसाठी तिरंगी लढत होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आ. रोहित पवार व आ. राम शिंदे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये या निवडणुकीमध्ये काटे की टक्कर आहे. यामुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी मोठी चुरशीची होणार असे चित्र होते. निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होईल, असे वाटत होते. मात्र, जिल्हा बँकेचे संचालक व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर करण्यात आ. शिंदे यांना यश आले, यामुळे पिसाळ यांची तिसरी आघाडी होणार असे ते स्वतः सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांना अखेर आ. शिंदे यांच्यासोबतच जावे लागले.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 212 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. यामध्ये तब्बल 167 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.आता एकूण 18 संचालक पदाच्या जागा असून यासाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत 2 हजार 577 मतदार आहेत. यामध्ये तालुक्यातील सहकारी संस्थेचे 972 मतदार आहेत.ग्रामपंचायत मतदारसंघात 845 मतदार आहेत. आडत व्यापारी मतदारसंघात 468 मतदार आहेत तर हमारी व्यापारी यासाठी 292 मतदार आहेत.
गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पक्षाचे तालुकाध्यक्ष थेट भाजपच्या मंडपात जाऊन बसले. नगर पंचायत निवडणुकीमध्ये आ. पवार यांनी आ. शिंदे यांना काही जागा बिनविरोध करून धक्का दिला होता. या निवडणुकीत आ.शिंदे यांनी आ. पवार यांना धक्का दिला आहे. पक्षाचा तालुकाध्यक्ष भाजपकडून उभा केला.