कर्जत-जामखेडला केवळ विकासाचे राजकारण- उपमुख्यमंत्री पवार

कर्जत-जामखेडला केवळ विकासाचे राजकारण- उपमुख्यमंत्री पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

सरकार अडचणीत असतानाही कर्जत - जामखेडला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन कोट्यवधीची कामे सुरू करण्यात आली आहेत. येथे केवळ विकासाचेच राजकारण केले जाणार आहे. यासाठी आम्ही आ. रोहित पवारांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

कर्जत येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात कर्जत येथे ते बोलत होते. पवार म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. राऊत यांनी त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. भविष्यात कर्जतमध्ये एमआयडीसी होणार आहे. त्यातून युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आ. रोहित पवार यांच्यासारखा सातत्याने जनतेसाठी धडपड करणारा लोकप्रतिनिधी येथील जनतेला मिळाला आहे हे या मतदारसंघाचे भाग्य आहे. सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन ते मंत्रालयामध्ये घेऊन पाठपुरावा करून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ते सोडवत आहेत.

यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, आ. रोहित पवार, राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, घनश्याम शेलार, कैलास शेवाळे, नामदेव राऊत, प्रवीण घुले, राजेंद्र गुंड, श्याम कानगुडे, सुनील शेलार, बापूसाहेब नेटके, नानासाहेब निकत, सचिन घुले, प्रा. विशाल मेहेत्रे, किरण पाटील, श्रीहर्ष शेवाळे, दीपक शिंदे, संतोष मेहेत्रे, लालासाहेब शेळके, सभापती मनीषा जाधव, शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार, शीतल धांडे आदी उपस्थित होते. आभार राजेंद्र फाळके यांनी मानले.

सही करून नंतर फोन करतो!

यावेळी बोलताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, आमदार रोहित पवार यांचा फोन मला आल्याबरोबर मी प्रथम माझ्या स्वीय सहाय्यकास फोन करून विचारतो की, आमदार रोहित पवार यांची काही फाईल आपल्या कार्यालयांमध्ये आलेली आहे काय ? मी अगोदर त्यावर सही करतो आणि नंतर त्यांना फोन करतो, कारण जोपर्यंत काम मंजूर होत नाही तोपर्यंत ते आम्हाला फोन करत असतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com