
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत - जामखेड मध्ये प्रत्येक क्षेत्रात दबावतंत्राचे राजकारण लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्जत जामखेड तालुक्याचे मोठे नुकसान झाले असल्याची टीका भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी येथे केली.
तालुक्यातील सितपूर येथे खासदार निधीमधून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आज झाला. यावेळी डॉ. विखे बोलत होते. यानंतर चिंचोली काळदात येथे अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, अंबादास पिसाळ, डॉ. सुनील गावडे, सचिन पोटरे, प्रकाश शिंदे ,बाळासाहेब देशमुख, डॉ.सुरेश भिसे, नाना तोरडमल, हरिभाऊ गावडे, बापूराव गायकवाड, अनिल गायकवाड, महेंद्र निंबोरे, बापूसाहेब काळदाते, नंदलाल काळदाते ,धनाजी काळदाते यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, राज्यात भाजपची सत्ता असती तर केंद्रामध्ये असलेल्या सत्तेचा आणखी फायदा झाला असता. कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करतात. या रस्त्यासाठी निधी कोणी आणला हे जनतेला सांगण्याची आवश्यकता पडत नाही. ज्या समाज कल्याण वसतिगृहाचे उद्घाटन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले यावर देखील खासदार विखे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
..तर माझे वडिल मंत्री असते
राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत झाले असताना केवळ वेगळे समीकरण निर्माण झाल्यामुळे राज्याची सत्ता इतर भोगत आहेत. परंतु जर भाजपची सत्ता असती तर माझे वडील देखील आज राज्याचे मंत्री असते, माजी मंत्री राम शिंदे आणि मी कर्जत जामखेडमध्ये या पाच वर्षांत एकही प्रश्न किंवा विकास काम शिल्लक ठेवले नसते असे डॉ. विखे यावेळी म्हणाले.