कर्जत-जामखेड मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार

प्रा. शिंदेंच्या विधानपरिषद उमेदवारीचे जल्लोषात स्वागत
कर्जत-जामखेड मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार

कर्जत | Karjat

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने कर्जत- जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. कर्जतमध्ये फटाके फोडून कार्यकर्त्यांनी प्रा. राम शिंदे यांचा जयघोष केला. यामुळे आ.पवारांच्या विरोधात तूल्यबळ ताकद निर्माण झाल्याने आता या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

बुधवारी मोठे शक्तिप्रदर्शन व घोषणाबाजी करत प्रा. राम शिंदे यांचा अर्ज भरण्यात आला. भाजपाने निष्ठावंत असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. त्याचा मोठा परिणाम कर्जत- जामखेड मतदारसंघातील राजकारणावर होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतर नगरपंचायत निवडणुकीतही भाजपाची मोठी पिछेहाट झाली. तेव्हापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता होती. आ. रोहित पवार हे दबाव आणि दडपशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाकडून झाला. सत्तेपासून दूर राहिल्याने कार्यकर्त्यांची घुसमट सुरू होती.

आ. रोहित पवार यांनी अडीच वर्षांच्या काळात मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावले. मात्र त्यांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप झाला. प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचेही जाहीर आरोप झाले. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नेत्यांना स्टेजवर बसायला संधी दिली जात नसल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यावर मतदारसंघात मोठी चर्चा झाली.

या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपाने प्रा. राम शिंदे यांच्यामागे मोठी ताकद उभा केली आहे. प्रा. शिंदे हे आमदार बनल्यानंतर मतदारसंघात तूल्यबळ विरोधक निर्माण होणार आहे. भाजपाची भूमिका जनमानसात स्पष्टपणे मांडणारे सचिन पोटरे, सुनील यादव, पप्पूशेठ धोदाड, गणेश पालवे, शेखर खरमरे, कैलास कायगुडे, गणेश जंजिरे, अतुल सुपेकर अशा गावागावातील कित्येक कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्याचा मोठा परिणाम येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com