कर्जत येथे हॉटेलवर 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला

सकल मराठा समाज आक्रमक || शहरात कडकडीत बंद
कर्जत येथे हॉटेलवर 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहरातील कुळधरण मार्गावरील तान्हाजी मालुसरे हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या वादातून टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केल्याची घटना शनिवारी (दि.24) रात्री घडली. हॉटेल चालक आणि कामगारांनाही मारहाण करण्यात आली याप्रकरणी पोलीसांनी सहाजणांना अटक केली आहे. या घटनेबाबात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मोर्चा काढून संशयितांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

प्रकाश चंद्रकांत कांबळे, करण बाळासाहेब थोरात, रोहन किसन कदम, सोहन किसन कदम, मनोज विजय माने, सागर गौतम समुद्र अशीअटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अमित बबलु कदम, भैय्या भैलुमे, साहिल भैलुमे, आदित्य विनायक भैलुमे, अनिकेत नंदकुमार समुद्र, (सर्व रा. कर्जत ) तसेच इतर 25 ते 30 अनोळखी लोकांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुळधरण मार्गावरील हॉटेल तान्हाजीमध्ये जेवायला आलेले प्रकाश कांबळे व त्याचे दोन साथीदार जेवन करून जाताना हॉटेलचे चालक पंडित निंबाळकर यांनी बिलाचे पैसे मागितले. यावरून प्रकाश कांबळे व त्यांच्यात वाद झाले. यावेळी प्रकाश कांबळे याने फोन करून इतरांना बोलावून घेतले.

टोळक्याने हॉटेलचे चालक पंडित निंबाळकर व महेंद्र लालासाहेब बागल यांच्यासह कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली. काठ्या, गज असे साहित्य घेवून आलेल्या टोळक्याने चालकासह कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करून हॉटेलमधील फ्रीज, काउंटर, किचन, टिव्ही, टेबल, खुर्च्या, बेसिन, पार्टीशन रूम आदी साहित्याची मोडतोड केली. आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.

शहरात पडसाद

या घटनेचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. सकल मराठा समाज चे समन्वयक वैभव लाळगे यांनी या घटनेचा निषेध करत कर्जत शहर बंदची हाक दिली. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. यानंतर रॅली काढून सर्वजन कर्जत पोलीस स्टेशन येथे गेले व या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com