माजी सैनिकाची हत्या करून लपले डोंगरात; पोलिसांनी अशी केली मोहीम फत्ते

माजी सैनिकाची हत्या करून लपले डोंगरात; पोलिसांनी अशी केली मोहीम फत्ते

खबऱ्याच जाळं आलं कामाला

अहमदनगर|Ahmedagar

हाॅटेलसमोर उभे केलेले वाहन काढून घेण्यास सांगितल्याने एका माजी सैनिकाला मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली.

पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे मच्छिंद्र फुंदे यांच्या साईप्रेम हॉटेल समोर सुधीर शिरसाठ याने त्याचे वाहन उभे केले होते. मच्छिंद्र यांचे भाऊ माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांनी सुधीरला वाहन काढून घेण्यास सांगितले. याचा राग सुधीरला आल्याने त्याने त्याच्या इतर साथीदारांना बोलवून घेतले. विश्वनाथ यांना लोखंडी पाईप व रॉडने मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना जबरदस्तीने वाहनामधून पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागे आणले. त्याठिकाणी मारेकऱ्यांनी विश्वनाथ यांना जबरदस्तीने दारु पाजून पुन्हा लोखंडी पाईप व रॉडने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या चौघांना एलसीबीने राहुरी तालुक्यातील कानडगावच्या डोंगरामध्ये पाठलाग करत पकडले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली आणि सुधीर शिरसाठसह आकाश वारे, आकाश डुकरे, गणेश जाधव यांना अटक केली. त्यांच्यासोबत असलेला केतन जाधव हा पसार झाला आहे.

विश्वनाथ फुंदे यांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांनी पाथर्डी सोडली. तिसगाव येथील एका मित्राच्या मदतीने त्यांनी राहुरी तालुक्यातील कानडगाव गाठले. कानडगावातील डोंगराच्या पायथ्याशी मारेकऱ्यांचा एक मित्र राहत होता. त्याच्या घरी मारेकऱ्यांनी आश्रय घेतला. मित्राच्या घरी डोंगराळ भागात आश्रय मिळाल्याने मारेकरी निश्चिंत होते. असे असले तरी त्यांचे पोलिसांकडे लक्ष होते. मारेकरी कानडगावच्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याची कुणकुण शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांना लागली. त्यांनी त्यांच्या परीनं आरोपींचा शोध घेतला, परंतु मारेकरी त्यांच्या हाती लागले नाही. जिल्ह्यात खबऱ्यांचे जाळं पक्क असलेल्या एलसीबीच्या एका पथकाला आरोपींच्या ठावठिकाणाची पक्की खात्री मिळाली. ते पथक त्यावेळी दुसऱ्या एका खूनाच्या गुन्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये आरोपींचा शोध घेत होते. त्या गुन्ह्यातील आरोपी मिळत नसल्याने त्या पथकाने राहुरी तालुक्यातील कानडगावच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. तो पर्यंत मारेकरी मित्राच्या घरी बिंधास्त होते. एलसीबीचे पथक कानडगावच्या डोंगराशी जाऊन धडकताच मारेकरी डोंगराच्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी डोंगरामध्ये त्यांचा पाठलाग करून आरोपींना पकडण्याची मोहीम फत्ते केली. एक आरोपी डोंगराचा फायदा घेत पसार झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com